पत्रकार सिद्दिक कप्पान यांना जनावरासारखे बांधून ठेवलंय!

Siddique Kappan - Maharastra Today
Siddique Kappan - Maharastra Today
  • सुटकेसाठी पत्नीचे सरन्यायाधीशांना साकडे

नवी दिल्ली : एका १९ वर्षांच्या दलित मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणाचे वृत्तांकन करणयासाठी हाथरस येथे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केलेले केरळमधील पत्रकार सिद्दिक कप्पान यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांच्या सुटकेसाठी तातडीने लक्ष घालावे, अशी कळकळीची विनंती कप्पान यांच्या पत्नीने सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमण यांना पत्र लिहून केली आहे.

कप्पान सध्या मथुरा मेडिकल कॉलेज रुग्णालयात असून काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचीही लागण झाली आहे. श्रीमती रैहान्त कप्पान यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मथुरा मेडिकल कॉलेज इस्पितळात माझ्या पतीला एखाद्या जनावरासारखे साखळीने बांधून ठेवण्यात आले असल्याने त्यांना जराही हालचाल करता येत नाही. गेले चार दिवस त्यांना जेवताही आलेले नाही की नैसर्गिक विधींसाठी स्वच्छतागृहातही जाता आलेले नाही. सरन्यायाधीशांनी कप्पान यांच्या सुटकेसाठी लगेच हस्तक्षेप केला नाही तर  त्यांचे आकाली निधन होईल, अशी भीतीही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

कप्पान यांच्या पत्नीने सरन्यायाधीशांच्या असे निदर्शनास आणले की, कप्पान यांच्या सुटकेसाठी गेल्या वर्षी ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेली ‘हेबियस कॉर्पस’ याचिका गेल्या ९ मार्चला निकाली निघणे अपेक्षित होते. परंतु त्यानंतर सात तारखा होऊनही त्या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. ती याचिका तातडीने सुनावणीस ग्यावी यासाठी २२ एप्रिल रोजी अर्ज केला तोही अद्याप न्यायालयापुढे आलेला नाही. त्यामुळे निदान हा अर्ज सुनावणीस घेईपर्यंत तरी कप्पान यांच्या सुटकेचा अंतरिम आदेश दिला जावा, अशी त्यांनी विनंती केली आहे.

दरम्यान, कप्पान यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्यांना मथुरेहून दिल्लीच्या ’एम्स’ किंवा सफदरजंग इस्पितळात हलविले जावे, अशी विनंती करणारी याचिका ‘केरळ युनियन ऑफ वर्किंंग जर्नालिस्ट’ने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. ती याचिका म्हणते की, २० एप्रिल रोजी कप्पान चक्कर येऊन स्वच्छतागृहात कोसळले व जखमी झाले. नंतर त्यांना कोरोनाचीही लागण झाली. त्या याचिकेतही कप्पान यांचा जीव धोक्यात असल्याची भीती व्यक्त करताना म्हटले आहे की, कप्पान यांना जेथे ठेवले होते तेथील ५० हून अधिक कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. मथुरा तुरुंगात पाण्याची एवढी टंचाई आहे की, कैद्यांना स्वच्छतागृहातील पाणी प्यावे लागत आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button