अदानी बदनामी प्रकरणात पत्रकार गुहांवर अटक वॉरन्ट

Pranya Guha Arrested

अहमदाबाद :- ज्येठ पत्रकार प्रणय गुहा ठाकूरता यांनी तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखावरून अदानी उद्योगसमूहाने दाखल केलेल्या बदनामीच्या दिवाणी दाव्यात कच्छमधील भूज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठाकूरता यांच्याविरुद्ध अटक वॉरन्ट जारी केले आहे.

ठाकूरता दाव्याच्या आधीच्या तारखांना नोटीस काढूनही हजर न राहिल्याने दिल्लीतील निजामुद्दीन पोलीस ठाण्याने त्यांना अटक करून कोर्टापुढे हजर करावे, असा आदेश दंडाधिकारी प्रदीप सोनी यांनी मंगळवारी दिला. ठाकूरता यांच्या वकिलांनी सांगितले की, ठाकूरता यांना १८ जानेवारीला न्यायालयात हजर राहायचे होते. त्यांना त्या एका दिवसापुरती सूट द्यावी, अशी आम्ही विनंती केली. पण हे प्रकरण गेली तीन वर्षे प्रलंबित असल्याने दरवेळी अशी सूट देता येणार नाही, असे म्हणत दंडाधिकाऱ्यांनी वॉरन्ट काढले.

प्णय गुहा ठाकूरता यांनी आणखी एका लेखकासह ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल विकली’ या इंग्रजी नियतकालिकात सन २०१७ मध्ये लिहिलेल्या लेखावरून अदानी उद्योगसमूहाने हा बदनामीचा दावा दाखल केला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने ‘विशेष औद्योगिक क्षेत्रां’च्या नियमांत अनुकूल बदल करून अदानी उद्योगसमूहाचा ५०० कोटी रुपयांचा फायदा करून दिला, असा आरोप त्या लेखात करण्यात आला होता.

हा लेख लिहिला तेव्हा ठाकूरता त्या नियतकालिकाचे संपादक होते. नंतर अदानी उद्योगसमूहाने बदनामी खटल्याची नोटीस पाठविल्यावर नियतकालिकाचे प्रकाशान करणाºया समीक्षा ट्रस्टने तो लेख नियतकलिकाच्या वेबसाइटवरून काढून टाकला. यावरून वाद होऊन ठाकूरता यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला.

कालांतराने ठाकूरता यांचा हाच लेख ‘दि वायर’ या न्यूज पोर्टलने प्रसिद्ध केला. अदानी उद्योग समूहाने त्यांनाही नोटीस पाठविली. पण ‘वायर’ने तिला दाद दिली नाही. त्यावरून अदानी उद्योगसमूहाने लेखक म्हणून ठाकूरता तसेच प्रकाशक व संपादक म्हणून ‘दि वायर’विरुद्ध भूज येथील न्यायालयात दिवाणी तर मुंद्रा येथील न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. मुंद्रा न्यायालयाने फिर्याद फेटाळली. त्यानंतर अदानी उद्योगसमुहाने ठाकूरता वगळता इतर आरोपींवरील दिवाणी दावाही मागे घेतला. त्यातच आता हे अटक वॉरन्ट काढण्यात आले आहे.

‘एडिटर्स गिल्ड’ या भारतातील संपादकांच्या प्रातिनिधिक संघटनेने ठाकूरता यांच्याविरुद्ध काढलेल्या अटक वॉरन्टचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. टीका करणार्‍या माध्यमांची बलाढ्य उद्योगसमुहांनी धाकदपटशाने मुस्कटदाबी करण्याचा हा निंद्य प्रकार आहे व त्याला न्यायालयांनीही साथ द्यावी हे दुर्दैवी आहे, असे गिल्डने गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER