पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात संभाजी राजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर, बंदीची मागणी

Girish Kuber - Renaissance State - Maharashtra Today

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ (‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’) या पुस्तकावरून आता चांगलाच वाद रंगला आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर (Girish Kuber) यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा आक्रमक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि संभाजी बिग्रेडने केला आहे. तसेच या संघटानांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी उचलून धरली आहे.

कुबेर यांच्या पुस्तकावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अमोल मिटकरी, भाजपचे आमदार अतुलभात खळकर यांनी सडकून टीका केली आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीसुद्धा केली गेली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून आणि कुबेर यांना पत्रं लिहून पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे कुबेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra” या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांद्वारे माझ्या वाचनात आला. मी अद्याप हे संपूर्ण पुस्तक वाचले नाही. तथापि या पुस्तकातील काही पाने माझ्या वाचण्यात आली आहेत. त्यामध्ये नमूद उल्लेख काळजीपूर्वक वाचला. कुबेर यांचा अर्थकारण, परराष्ट्रधोरण, विशेषतः रशियाचे राजकारण यासंबंधीचा व्यासंग पाहता त्यांनी यासंदर्भात केलेले हे उल्लेख वाचून सखेद आश्चर्य वाटले. कुणा परदेशी लेखकाची ऐकीव माहिती किंवा मुघल इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखांवर आधारित ऐतिहासिक लिखाण करणे, एकांगी व तथ्यहीन असेल ही बाब कदाचित कुबेर यांच्या लक्षात आली नसावी, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्या कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर देखील महाराणी सोयराबाई जिवंत होत्या. हे दाखवणारी अनेक साधने व पुरावे उपलब्ध आहेत. तीच बाब बुऱ्हाणपूर मोहिमेसंदर्भात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील “स्वराज्यरक्षक संभाजी” मालिका करताना मी हे पदोपदी अनुभवले आहे. त्याचप्रमाणे अशा विधानांचा आधार घेऊन भविष्यात पुन्हा बदनामीचे षडयंत्र रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माझी संबंधित लेखक व प्रकाशकांना विनंती आहे की, शिवशंभू प्रेमींच्या भावनांचा आदर करून आणि सत्याची कास धरून सदर आक्षेपार्ह विधाने वगळण्यात यावीत. लेखकाच्या लेखन स्वातंत्र्याविषयी जो आदर आहे, त्यास तडा जाऊ देऊ नये ही विनंती, असं खासदार कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने पुस्तकात बदनामीकारक मजकूर छापल्या प्रकरणी कुबेर यांनी देशाची माफी मागावी. तसेच या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे. चुकीच्या आणि खोडसाळ लेखांमुळे वादग्रस्त ठरलेल्या कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकातून बदनामीची ही परंपरा कायम राखली आहे. स्वधर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहीती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. या माहितीला समकालिन इतिहासातील कोणतेही पुरावे नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत दिलेला हा बदनामीकारक मजकूर संतापजनक आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली, असे बिनबुडाचे दावे कुबेरांनी केलेले आहेत, असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्यांसोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा मिळतो. लेखकांचा हाच उद्देश असेल तर हे गंभीर आहे. या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांनी पुस्तकावर आक्षेप घेतला असला तरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंटरेस्टिंग पुस्तक वाचत असल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी तसं ट्विटच केलं आहे. त्यामुळे या पुस्तकावरून राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह असल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button