
- खोट्या बातम्या देऊन गुमराह करणा-या किती गोदी मीडियावर कठोर कारवाई झाली? – सामना
- हे जे कोणी श्रेष्ठ ज्येष्ठ पत्रकार आज सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारीत आहेत, त्यांच्या अतिरेक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे फटके शिवसेनेनेही खाल्लेच आहेत.
मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आज पत्रकारिता व पत्रकारांवर भाष्य केले आहे. भारतातील पत्रकारिता इतकी हतबल व लाचार कधीच झाली नव्हती. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याची आपली परंपरा आहे. ‘सत्यमेव जयते’ हे आपले बिरुद आहे, पण निवडणूक प्रचारात थापा मारून लोक सत्तेवर येतात. असत्याचा रोज जय होतोय. मात्र एक शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात मेला की अपघातात? यावर कोर्टमार्शल करून पत्रकारांना देशद्रोहाच्या वधस्तंभावर लटकविले जात आहे. पंतप्रधान मोदी हे कधीकाळी पत्रकारांचे मित्र होते. पत्रकारांनीच मोदींना शिखरावर नेले. आपल्या जुन्या मित्रांसाठी मोदी दोन अश्रू ढाळतील काय?, असा सवाल त्यांनी आजच्या सामना अग्रलेखातून विचारला आहे.
देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडतआहेत. लोकशाहीच्या प्रकृतीसाठी ते चांगले नाही.प्रजासत्ताकदिनी एका शेतकऱ्याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याचे ‘ट्विट’ राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, शशी थरूर व अन्य तीन पत्रकारांनी केले. त्यावर सरकारने म्हणजे दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई केली. हे सर्व लोक देशद्रोही, दंगलखोर, अफवा पसरवून गुजराण करणारे आहेत़ असे कठोर कायदे लावून त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली. त्यावर तूर्त तरी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, पण या मंडळींच्या डोक्यावर अटकेची व कारवाईची टांगती तलवार कायम आहे व ती तशीच ठेवली जाईल. खरे तर या सर्व पत्रकारांच्या मागे देशातील पत्रकारांनी ठामपणे उभे राहायला हवे. आज हे लोक जात्यात आहेत व इतर सुपात असले तरी जे सुपात आहेत त्यांनादेखील भविष्यात भरडून किंवा चिरडून जाण्याचे भय आहे. हे सर्व लोक कालपर्यंत सन्माननीय पत्रकार, संपादक होते.
दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकरी घुसले व लाल किल्ल्यावर पोहोचून धुडगूस घातला हे सरकारचे अपयश आहे. असेही सामनात म्हटले आहे.
हे जे कोणी श्रेष्ठ ज्येष्ठ पत्रकार आज सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारीत आहेत, त्यांच्या अतिरेकी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे फटके शिवसेनेनेही खाल्लेच आहेत. निखिल वागळे यांच्या अतिरेकी कलमबाजीबद्दल संतापलेल्या शिवसैनिकांनी वागळ्यांवर हल्ला केला असे सांगतात. त्यावेळी आज देशद्रोही ठरलेले हेच बहुतेक पत्रकार शिवसेना भवनाच्या दारात ‘मांडव’ घालून तांडव करीत होते, शिवसेनेच्या नावाने शंख करीत होते. तरीही आम्ही म्हणतो ते देशद्रोही नाहीत व त्यांचा असा छळ करणे योग्य नाही. सध्या मात्र ‘सब घोडे बारा टके’ भावाने ऊठसूट प्रत्येकावर देशद्रोहाचीच कलमे लावली जात आहेत. या गुन्हय़ासाठी भारतीय दंड संहितेत इतरही कलमे आहेत. त्यांचा विसर कायदा राबविणाऱ्यांना पडला असेल तर ते धक्कादायक आहे.
सरदेसाई, थरूर, मृणाल पांडे, जफर आगा, परेश नाथ, विनोद के. जोस, अनंत नाथ यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हरकत नाही, पण खोटय़ा बातम्या देऊन लोकांना गुमराह करणाऱ्या किती गोदी मीडियावर आतापर्यंत अशा कठोर पद्धतीने कारवाया झाल्या आहेत? मीडिया बडय़ा भांडवलदारांचा उद्योग झाला आहे व हे सर्व भांडवलदार राज्यकर्त्यांच्या टाचेखालीच गुदमरलेल्या अवस्थेत जगत असतात. असे खडे बोलही सामनातून माध्यमांवर केले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला