न्यायाची थट्टा : धनाढ्य पती तुरुंगात, पत्नी वार्‍यावर !

Sc - Aarested -Maharastra Today

Ajit Gogateपत्नीला पोटगी व घर देण्याच्या आदेशाचे पालन करण्यात टाळाटाळ करणार्‍या चेन्नई येथील मायकेल अरुल या धनाढ्य पतीला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावणारा सर्वोच्च न्यायालयाचा गेल्या आठवड्यातील आदेश ही न्यायाची घोर थट्टा आहे. या प्रकरणावरून आधीच गाढव असलेला कायदा न्याय करण्यात किती तोकडा पडतो हे अधोरेखित झाले आहे. गेली १६ वर्षे, पदरमोड करून, दंडाधिकारी न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटल्यांच्या अनेक फेऱ्या लढलेल्या आणि प्रत्येक टप्प्याला कोर्टाचा निकाल तिच्या बाजूने झालेल्या पत्नीच्या वाट्याला घोर निराशा आली आहे.

हे प्रकरण मायकेल अरुल ही चेन्नईमधील एक धनाढ्य व्यक्ती व त्याने रीतसर घटस्फोट न घेता गेली २५ वर्षे सोडून दिलेल्या जेनिफर अरुल या कमनशिबी पत्नीमधील आहे. जेनिफरला सोडून मायकेल एका परदेशी स्त्रीसोबत राजरोसपणे राहू लागला. नाइलाजाने जेनिफरला चरितार्थासाठी ‘एनडीटीव्ही’मध्ये नोकरी पत्करावी लागली.

या दु:खद घटनाक्रमाची सुरुवात चेन्नईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात सन २००९ मध्ये झाली. जेनिफरने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणार्‍या कायद्यान्वये (Protection of Women Against Domestic Violence Act) मायकेलविरुद्ध खटला दाखल केला. दंडाधिकार्‍यांनी दणक्यात जेनिफरच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार मायकेलने दुसर्‍या कायमस्वरूपी घराची व्यवस्था करेपर्यंत जेनिफरला त्याच्या एग्मोरमधील घरातच राहण्याचा हक्क मिळाला. याशिवाय मायकेलने जेनिफरला एकूण तीन कोटी रुपये देण्याचाही आदेश झाला. त्यापैकी दोन कोटी रुपये दरमहा पोटगीची २००९ पासूनची थकबाकी होती. बाकीची तीन कोटींची रक्कम पुढील प्रत्येक कारणासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये याप्रमाणे होती : जेनिफरला १२ वर्षे सोडून देणे, मायकेलने परस्त्रीसोबत राहणे, जेनिफरला कोर्टकज्जे करण्यास भाग पाडणे, जेनिफरला नोकरी करण्यास भाग पाडणे, विदेशी परस्त्रीसोबत राहून जेनिफरला मानसिक क्लेश सोसायला लावणे आणि राहत्या घराचे ठरल्याप्रमाणे आपल्या वाट्याचे भाडे न भरणे.

पुढील पाच वर्षांत मायकेलने सत्र न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय अशा तीन पातळ्यांवर अपिले केली. प्रत्येक ठिकाणी दंडाधिकाऱ्यांचा मूळ आदेश कायम झाला. सर्वोच्च न्यायालयाने दरमहिन्याची पोटगी व थकबाकी चुकती करण्यास सहा महिन्यांची मुदत देऊन मायकेलचे अपील ऑक्टोबर २०१७ मध्ये फेटाळले. मायकेलने तरीही आदेशाचे पालन केले नाही, जेनिफरने ‘कन्टेम्प्ट’ याचिका दाखल केली. पण आधीच्या आदेशानुसार सहा महिन्यांत पैसे चुकते करण्याची लेखी हमी मायकेलने दिलेली नव्हती. त्यामुळे न्यायाधीशांच्याच सल्ल्यावरून जेनिफरने ‘कन्टेम्प्ट’ याचिका मागे घेऊन त्याऐवजी फेरविचार याचिका (Review Petition) दाखल केली. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व पैसे चुकते करण्यासाठी मायकेलला एक वर्षाची मुदत दिली. त्यातील २५ टक्के थकबीकाचा पहिला हप्ता त्यानंतरच्या तीन महिन्यांत दंडाधिकारी न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला गेला.

तसेच मायकेल याचा पासपोर्टही कोर्टात जमा करून घेण्यात आला. परंतु मायकेलने तरीही थकबाकी चुकती केली नाही की दरमहिन्याची पोटगी देणेही सुरू ठेवले नाही. जेनिफरने पुन्हा ‘कन्टेम्प्ट’ याचिका केली. १९ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने मायकेलला शेवटची एक महिन्याची मुदत दिली. तरीही मायकेलने पैसे भरले नाहीत तेव्हा अखेर २२ मार्च रोजी मायकेलला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली. ही शिक्षा न्यायालयाचा आदेश न पाळल्याबद्दल दिली गेली.

आता कायद्याचे तोकडेपण व त्यामुळे घोर अन्याय कसा होतो ते पाहू. मायकेलला ‘कन्टेम्प्ट’बद्दल शिक्षा झाली असली तरी शिक्षेच्या या आदेशाने गेल्या १० वर्षांत जेनिफरच्या बाजूने झालेल्या सर्व आदेशांवर बोळा फिरणार आहे. तीन महिने तुरुंगात राहून बाहेर आल्यावर जेनिफरला दरमहिन्याची पोटगी किंवा शिल्लक असलेली अडीच कोटी रुपयांची थकबाकी देण्याचे कोणतेही बंधन मायकेलवर असणार नाही. एका परीने कोर्टाचे आदेश न पाळणे मायकेलला फायद्याचे ठरले आहे. कारण तीन महिन्यांच्या साध्या कैदेच्या बदल्यात जेनिफरला एक छदामही देण्याच्या बंधनातून तो कायमचा मुक्त होणार आहे. जेनिफरला मात्र पतीला तुरुंगात धाडल्याचा आसुरी आनंद मानण्याखेरीज हाती काहीच पडणार नाही.

‘कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट’ अ‍ॅक्टमध्ये जास्तीत जास्त सहा महिन्यांची कैद व कमाल दोन हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे. म्हणजे खरे तर सर्वोच्च न्यायालयाने मायकेलला शक्य असलेली जास्तीत जास्त शिक्षाही दिली नाही. हे सर्व पाहिल्यावर माझ्या डोळ्यांपुढे या शोकांतिकेच्या शेवटच्या अंकात जे शेवटचे दृश्य आहे त्यात पराभूत पक्षकार वाकुल्या दाखवत आहे. विजयी पक्षकार पश्चात्तापाने कपाळवार हात मारून घेत आहे व डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवता हतबलतेने हात चोळीत बसली आहे!

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button