जॉन अब्राहम म्हणतो, ओटीटीवर रिलीज होणारे सिनेमे दुय्यम दर्जाचे

John Abraham says that movies released on OTT are secondary

थिएटर सुरु न झाल्याने अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात आहेत. यात अक्षयकुमार, अजय देवगण, अभिषेक बच्चनपासून अनेक कलाकारांचा समावेश आहे. संजय गुप्ता द्वारा निर्मित दिग्दर्शित जॉन अब्राहम (John Abraham) अभिनीत मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आधारित ‘मुंबई सागा’ही (Mumbai Saga)ओटीटीवर रिलीज केला जाणार असे म्हटले जात होते. पण जॉन अब्राहम सिनेमा थिएटरमध्येच रिलीज करण्यावर ठाम असल्याने अखेर सिनेमा १९ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे जॉन बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या (Salman Khan) ‘राधे’बरोबर टक्कर घेण्यास तयार झाला आहे. जॉन म्हणतो, ज्या अभिनेत्याला त्याच्या सिनेमावर विश्वास असतो तोच थिएटरमध्ये सिनेमा रिलीज करतो. जे दुय्यम दर्जाचे असतात तेच ओटीटीवर येतात. जॉनचे हे वक्तव्य वादाला खतपाणी घालणारे आहे.

संजय गुप्ताला अंडरवर्ल्डचे खूप आकर्षण आहे म्हणूनच त्याच्या सिनेमाचे विषय अंडरवर्ल्डशी संबंधित असतात. मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आधारित त्याने मुंबई सागा सिनेमाला गेल्या वर्षी सुरुवात केली होती. गेल्या वर्षीच हा सिनेमा रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमा रिलीज झाला नाही आणि यावर्षी बॉक्स ऑफिसवर तारीख मिळत नसल्याने सिनेमा ओटीटीवर आणण्याचा विचार सुरु करण्यात आला होता. एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत बोलणेही सुरु झाले होते. याबाबत बोलताना जॉनने सांगितले, मला जेव्हा कळले की, निर्माते सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा विचार करीत आहेत तेव्हा मी निर्माता भूषण कुमार आणि संजय गुप्ताशी चर्चा केली आणि सिनेमा थिएटरमध्येच रिलीज करावा असे सुचवले. २०१९ प्रमाणे सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करणार नाही पण जे प्रेक्षक येतील त्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल आणि आपली प्रशंसा होईल. मला माझ्या सिनेमावर विश्वास असल्याने त्यांनी माझे म्हणणे ऐकले आणि आम्ही सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

ओटीटीवर जे सिनेमे रिलीज होतात त्यापैकी ९० टक्के सिनेमे हे दुय्यम दर्जाचे असतात. ज्या कलाकारांना स्वतःवर विश्वास नसतो ते आपले सिनेमे ओटीटीवर रिलीज करतात असे म्हणत जॉनने पुढे सांगितले, याचा अर्थ असा नाही की, माझा सिनेमा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. पण प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल याची मला खात्री आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER