जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकत्र येणार!

John Abraham and Abhishek Bachchan will be reunited!

यशराजच्या ‘धूम’मध्ये (Dhoom) चोर असलेला जॉन इन्स्पेक्टर असलेल्या अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) हातावर तुरी देऊन चोऱ्या करीत असतो. हा सिनेमा सुपरहिट झाला होता आणि अभिषेक बच्चन नायक असला तरी जॉन अब्राहम (John Abraham) भाव खाऊन गेला होता. त्यानंतरच यशराजला खलनायकच खरा नायक असल्याचे दाखवावे असे सुचले आणि त्याच धर्तीवर ‘धूम’चे पुढील भाग तयार करण्यात आले. धूममध्ये एकमेकांचे दुश्मन असलेले जॉन आणि अभिषेक यांना करण जोहरने त्याच्या ‘दोस्ताना’ सिनेमात मैत्री करताना दाखवले; पण त्यांच्या मैत्रीला ‘गे’पणाची झलक दिली होती. हा सिनेमा कथानक आणि जॉन, अभिषेकच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना खूपच भावला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. दोन सुपरहिट सिनेमे दिलेले जॉन आणि अभिषेक आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर करामत करण्यासाठी एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

२०१९ या वर्षी मल्याळम भाषेतील ‘अय्यपनम कोशियुम’ नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात बीजू मेनन आणि ‘अय्या’ या हिंदी सिनेमात राणी मुखर्जीचा नायक झालेला पृथ्वीराज या दोघांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळाली होती. जॉनने जेव्हा हा सिनेमा पाहिला तेव्हा त्याला तो खूपच आवडला होता आणि त्याने लगेचच या सिनेमाचे हिंदी रिमेकचे अधिकार विकत घेतले होते. खरे तर जॉन गेल्या वर्षीच या सिनेमाचे काम सुरू करणार होता; पण कोरोनामुळे तो हा सिनेमा सुरू करू शकला नव्हता. कोरोनानंतर पुन्हा शूटिंग सुरू होताच जॉनने त्याचे अर्धवट राहिलेले सिनेमे पूर्ण करण्याचे काम हाती घेतले. त्याने सर्वप्रथम त्याचा ‘सत्यमेव जयते-२’ सिनेमा पूर्ण केला असून आता तो शाहरुख खानसोबत ‘पठाण’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आणखी दोन सिनेमे हातात असतानाच त्याने आता ‘अय्यपनम कोशियुम’चे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सिनेमात जॉन भूमिका करणार असून दुसऱ्या भूमिकेसाठी तो एका चांगल्या नायकाच्या शोधात होता. अभिषेकसोबत त्याची चांगली मैत्री झालेली असल्याने त्याने अभिषेकला या सिनेमात काम करण्याबाबत विचारले. अभिषेकनेही सिनेमाबाबत ऐकलेले असल्याने त्याने लगेचच काम करण्यास होकार दिल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा एक प्रामाणिक इन्स्पेक्टर आणि एका बिघडलेल्या श्रीमंत तरुणामधील वादावर आधारित आहे. जॉन हा इन्स्पेक्टरची भूमिका साकारणार असून अभिषेक बच्चन बिघडलेल्या श्रीमंत तरुणाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. पठाणचे काम संपल्यावर जॉन कदाचित या सिनेमाला सुरुवात करील असे सांगितले जात आहे. सिनेमाचे कथानक खूपच जबरदस्त असल्याने जॉन आणि अभिषेकच्या अभिनयाची जुगलबंदी या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER