जोफ्रा आर्चर गोलंदाजीपेक्षा फलंदाजीतच चमकतोय

Jofra Archer

जोफ्रा आर्चर (Jofra Archer) गोलंदाज आहे की फलंदाज, असा प्रश्न पडावा अशी कामगिरी तो सध्या आयपीएलमध्ये (IPL) करतोय. रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) खेळलेले दोन्ही सामने त्याने आपल्या तडाखेबंद फलंदाजीने गाजवले आहेत.

जोफ्रा आर्चरने मंगळवारी सीएसकेच्या एनगिडीच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्याला जोफ्रा आर्चरने सलग चार षटकार लगावले. दोन नोबाॕल असलेल्या चार चेंडूत चार षटकार अशा दोनच वैध चेंडूवर 27 धावा वसुल करण्याचा अद्वितीय विक्रम त्याने केला होता. त्यानंतर रविवारी किंग्ज इलेव्हनच्या मोहम्मद शामीचाही लौकिक त्याने धुळीस मिळवला. रॉबिन उथप्पा बाद झाल्यानंतर त्याने लगेचच पुढच्या दोन चेंडूंना षटकार लगावले आणि तेवटीयाच्या तुफानात आणखी भर घालून राजस्थानचा विजय निश्चित केला. याप्रकारे यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 11 चेंडूतच 40 धावा केल्या आहेत. हे पाहता पुढच्या सामन्यात राॕयल्सने त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले तर आश्चर्य वाटायला नको.

आयपीएलच्या आधीसुध्दा टी-20 सामन्यांमधील आर्चरची आकडेवारी काढली तर तो उपयुक्त फलंदाज असल्याचे सिध्द झाले आहे.शंभर टी-20 सामन्यांमध्ये त्याने 51 वेळा फलंदाजी केली आहे पण तळाला फलंदाजीला येत असल्याने त्याला फारच कमी चेंडू खेळायला मिळाले आहेत. सरासरी 6 चेंडूच तो खेळू शकला आहे. असे असले तरी त्याचा स्ट्राईक रेट मात्र 147.58 असा तगडा राहिला आहे. या शंभर टी-20 सामन्यांमध्ये त्याने ज्या 459 धावा केल्या आहेत त्यापैकी अडीचशे धावा चौकार- षटकारातून आल्या आहेत. म्हणजे 55 टक्के धावा त्याने चेंडू सीमापार करून मिळवल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER