
इंग्लंडचा संघ भारत (England Vs India) दौऱ्यावर आहे आणि शुक्रवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यावर भारतीय गोलंदाजांना एका फलंदाजाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे, तो म्हणजे जो रुट (Joe Root) . आॕस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाज स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वाॕर्नरला (David Warner) रोखण्यात यशस्वी झाले होते आणि टीम इंडियाच्या यशात तो महत्त्वाचा फरक ठरला होता. त्याप्रमाणेच या दौऱ्यात जो रुटला रोखणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यामागचे कारण असे की, एकतर जो रुटचा हा 100 वा कसोटी सामना आहे आणि त्यामुळे हा सामना मोठी खेळी करुन संस्मरणीय करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
दुसरी गोष्ट म्हणजे 99 कसोटी सामन्यानंतर गावसकर, तेंडूलकर, लारा व द्रविड यांच्यापेक्षाही रुट एका बाबतीत पुढे आहे ती म्हणजे या सर्वांपेक्षा त्याच्या नावावर अधिक अर्धशतकी (50+) खेळी आहेत. 99 कसोटीनंतर तेंडूलकर व द्रविडच्या प्रत्येकी 63, ब्रायन लाराच्या 64, सुनील गावसकर यांच्या 66 खेळी 50 पेक्षा अधिक धावांच्या आहेत आणि जो रुटच्या अशा 68 खेळी आहेत.
तिसरी गोष्ट म्हणजे तो सध्या जबर फाॕर्मात आहे. भारतात दाखल होण्याआधीच्या श्रीलंका दौऱ्यात त्याने एकट्याने इंग्लंडच्या 960 धावांपैकी 426 धावा केल्या. हे त्याचे योगदान 44.4 टक्के येते आणि त्यात विशेष म्हणजे त्याने फिरकी गोलंदाजांविरुध्द चांगल्या धावा केल्या. त्याच्या या 426 धावांपैकी 381 धावा या फिरकी गोलंदाजांविरुध्द आहेत आणि आता भारतात फिरकी गोलंदाजांवरच टीम इंडियाची मदार राहिल असे मानले जात आहे. या 426 धावा करताना तो फक्त दोन वेळा बाद झाला तर फलंदाज 20 वेळा बाद झाले. या मालिकेत श्रीलंकेचा सर्वात सफल गोलंदाज ठरलेला लसीथ एम्बुलदेनियाविरुध्द त्याने एकदाही बाद न होता 200 धावा केल्या. गेल्या 20 वर्षात एखादा फलंदाज व गोलंदाजाबाबत असे पहिल्यांदा घडले आहे. त्यामुळे जो रुट हा भारतीय गोलंदाजांसाठी, विशेषतः फिरकी गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
जो रुटबाबत लक्षात घ्यायला लागणारी चौथी गोष्ट म्हणजे जानेवारी 2018 पासून म्हणजे गेल्या तीन वर्षात त्याची परदेशातील सरासरी 53.90 धावांची आहे आणि त्याच्या मायदेशातील सरासरीपेक्षा ही तब्बल 20 धावांनी अधिक आहे. परदेशातील 17 कसोटीत त्याची 5 शतके आहेत आणि मायदेशातील 18 कसोटीत फक्त एक शतक आहे. या काळात मायदेशात व परदेशातही त्याने सारख्याच 32 डावात फलंदाजी केली मात्र यात त्याने परदेशात केलेल्या धावा ह्या मायदेशातील धावांपेक्षा 653 ने जास्त आहेत.
रुटचे समकालीन जे फॕब फोर मानले जातात त्यापैकी स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली व केन विल्यम्सन हे याबाबतीत रुटच्या तुलनेत फिके आहेत. रुटची मायदेशातील (50.55) व परदेशातील (48.16) सरासरी जवळपास सारखी आहे. याच्या तुलनेत इतर तिघांच्या सरासरीत मोठा फरक आहे. स्टिव्ह स्मिथच्या सरासरी अनुक्रमे 67.72 व 57.10 आहेत. विराट कोहलीच्या 68.42 व 44.23 आहेत. केन विल्यम्सनच्या सरासरी अनुक्रमे 65.31 व 45.57 आहेत. हे पाहता फॕब फोरपैकी एकटा जो रुटच मायदेशात व परदेशातही सारख्याच सातत्याने धावा करतोय.
ही सर्व आकडेवारी पाहता जो रुटचे यश- अपयश हा भारत- इंग्लंड मालिकेत कळीचा मुद्दा ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला