जो रूट आणि राॕब लुईस, क्रिकेटप्रेमाची अनोखी कहाणी

Joe Root Salutes Rob Lewis

श्रीलंकेतील गाॕल कसोटीत (Galle) इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) शानदार द्विशतकी खेळी केली. त्याने केलेल्या 228 धावांच्या खेळीने इंग्लंड आता त्या सामन्यात विजयाच्या स्थितीत आहे पण घडले असे की शतक केले जो रुटने आणि बक्षीस मिळाले रँडी कॕडीक उर्फ राॕब लुईस याला.

हा राॕब लुईस कोण आणि त्याचा काय संबंध? या नावाचा कुणी खेळाडू तर इंग्लंडच्या संघातसुध्दा नाही मग जो रुटने द्विशतक केले आणि बक्षीस त्याला मिळाले असे कसे? तर यामागची कहाणी मोठी मनोरंजक आहे.

हा राॕब लुईस (Rob Lewis) उर्फ रँडी कॕडीक (Randy Caddick) हा गेल्या मार्चमध्ये श्रीलंकेत आला होता. त्यावेळी नियोजीत इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचे सामने बघण्याचे त्याचे नियोजन होते पण कोरोनाने सारा विचका केला. ती मालिकाच रद्द झाली पण हा गडी घरी न परतता श्रीलंकेतच थांबून राहिला…या आशेने की इंग्लंडचा संघ पुन्हा लंकेत खेळायला येईल आणि आपण त्यांचा खेळ बघू…थोडथोडके नाही तर गेल्या तब्बल 10 महिन्यांपासून तो श्रीलंकेतच आहे आणि त्याची ही प्रतीक्षा 14 तारखेला फळाला आली जेंव्हा इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यानचा पहिला कसोटी सामना खेळला गेला.

या सामन्यासाठी तेथे उपस्थित इंग्लंडच्या संघाचा तो एकमेव समर्थक आहे म्हणूनच जो रुटने शनिवारी जेंव्हा द्विशतक पूर्ण केले तेंव्हा त्याने रॉब लुईस उर्फ रँडी कॕडीकला खास अभिवादन केले. श्रीलंकेत 10 महिने थांबून राहिल्याचे त्याचे हे अतिशय संस्मरणीय बक्षीस होते. एवढेच नाही तर गाॕल येथील किल्ल्यावरुन हा सामना बघण्याची त्याला एकट्यालाच परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंड संघाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने त्याच्यासाठी ही विशेष परवानगी मिळवली आहे..

37 वर्षीय राॕब लुईस हा पेशाने वेब डिझायनर आहे. एवढे 10 महिने श्रीलंकेत का थांबून राहिला याबद्दल तो सांगतो की मला आशा होती की हा कोरोना वगैरे जे काही आहे ते साधारण महिनाभरात संपेल म्हणून मी थांबून राहिलो. त्यासाठी मी प्रार्थनासुध्दा करत राहिलो पण कोरोना लांबतच गेला, लांबतच गेला तरीसुध्दा एकदाही घरी परतण्याचा विचार माझ्या मनाला शिवला नाही. इंग्लंडच्या तुलनेत लंकेत राहण्याचा खर्च कमी असल्याने त्याला आर्थिकदृष्ट्या हे फार जड गेले नाही पण इंग्लंडच्या संघाला खेळताना बघायची त्याची स्वप्नपूर्ती झाली. सामन्याठिकाणी मैदानात खेळाडू व स्टाफ आणि सामन्याशी संबंधित मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कुणाला प्रवेश नसला तरी लुईस उर्फ रॕडीकला मैदानाजवळच्या किल्ल्यावरुन हा सामना बघण्याची विशेष परवानगी मिळाली आहे. म्हणून जो रुटने द्वीशतक साजरे करताना त्यांच्या या चाहत्याला विशेष अभिवादन केले.

सामन्याच्या आरंभी या चाहत्याबद्दल रुटने म्हटले की, मला त्याच्याबद्दल समजलेय. यैत्या काही दिवसात त्याच्याशी झूमद्वारे किंवा फोनवरुन संपर्क साधता आला तर मला आनंद होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER