मालिकेसाठी सोडली नोकरी 

Shivani Baokar

अनेक कलाकारांनी आजवर आपल्या अभिनयासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. काहींनी नोकरीच सोडली तर काही कलाकार नोकरी सांभाळून अभिनयदेखील करतात. जिथे आपलं पॅशन असतं तिथे आपल्याला हिंमत मिळते. म्हणून याचं पॅशन आणि अभिनयाच्या हिंमतीवर एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि अभिनयात पदार्पण केलं. कोण आहे ही अभिनेत्री बघूया …. अभिनयाची आवड आणि पुढे हेच आपलं आयुष्य असं म्हणून अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) हिने नोकरी सोडून अभिनयात पदार्पण केलं.

तिच्या या खास प्रवासाबद्दल जाणून घेऊ या. ‘लागीर झालं जी’ या खास मालिकेसाठी तिने नोकरी सोडली आणि हा रोल स्वीकारला. अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंमतीने काम करत अनोखी ओळख निर्माण केली. ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील ‘शीतली’ या खास भूमिकेसाठी तिने आपली नोकरी सोडली. या मालिकेतून शीतली घराघरांत पोहचली. तिच्या या खास प्रवासाबद्दल सांगताना शिवानी सांगते, “अभिनयाची गोडी आधीपासूनच होती. घरातून मला अभिनयासाठी नेहमीच पाठिंबा होता; पण अभिनयासोबत कुठेही शिक्षण मागे सोडू नकोस असं घरच्यांनी सांगितलं आणि प्लॅन बी नेहमी सोबत असावा म्हणून कॉलेज पूर्ण केलं. रूपारेलमध्ये असताना कॉलेजमधल्या एकांकिकांमध्ये छोटं काम करायची.

एका एकांकिकेत मला छोटासा रोल मिळाला, अगदी एकच वाक्य होतं; पण ते मिळाल्याचा आनंद खूप जास्त होता. प्रत्येक प्रयोगाला मी जायचे तर यात खूश होते. शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला. मास्टर्स करत असताना ऑडिशन देत होते. तेव्हा हिंदी जाहिरातीसाठी ऑडिशन दिल्या. मग यातून ऑडिशन कशी असते यांची एक कल्पना आली. मग स्वतःचा पोर्टफोलिओसुद्धा बनवला. मग फक्त ऑडिशनच्या भरवशावर न राहता सोबतीने जॉब करू या असं ठरवलं . मास्टर्स आणि जर्मन शिकत असताना सहज मुलाखत दिली आणि मला नोकरी मिळाली. एक वर्ष नोकरी केली. नोकरी करताना मी ‘उंडगा’ हा चित्रपट केला. मग नोकरी सांभाळून अभिनय चालू होता. माझ्या एका मित्राने माझे फोटो कुठे तरी पाठवले आणि त्यातून मला ‘लागीर झालं जी’साठी फोन आला.

नोकरीमुळे साताऱ्याला ऑडिशन द्यायला जायला जमलं नाही. मग फोनवरून ऑडिशन दिली आणि मालिकेचे लेखक तेजपाल वाघ यांनी सांगितलं की, काम आवडलं. मग मला त्यांनी सांगितलं की, तुला आताच्या आता नोकरी सोडावी लागेल आणि इकडे यावं लागेल .मग त्या घाईत नोकरी सोडली. खूप समस्या आल्या; पण घरच्यांनी पाठिंबा दिला. ते सोबत होते म्हणून इथवर पोहचले. इथून नवीन प्रवास सुरू झाला. मग साताऱ्याला गेल्यावर समजलं की, आपल्याला एक महिना इथेच राहायचं आणि शीतलच्या भूमिकेसाठी साताऱ्याची मूळ भाषा शिकण्याची सुरुवात झाली. जसं जर्मन शिकताना तयारी केली तेवढ्याच तयारीने नवीन भाषा शिकायला सुरुवात झाली .

मूळ भाषेवर जम बसवण्यासाठी ती शिकण्याची अनोखी पद्धत वापरत गेले. मग वही-पेन घेऊन तासभर मार्केटमध्ये जाऊन तिथल्या लोकांची भाषा ऐकायचे तर असं करता करता ती भाषा अवगत होत गेली. सुरुवातीला तिथले लोक काय बोलायचे हे समजायचं नाही. मग थोडं टेन्शन यायचं की, ही भाषा आपल्याला समजतं नाही आणि त्या भाषेत आपल्याला भूमिका साकारायची हे दडपण होतं.

ही भूमिका साकारणं हे एक आव्हान होतं आणि हे जमत गेलं आणि पुढे मी फार एन्जॉय केलं; कारण कधी गावाला गेले नव्हते आणि म्हणून मालिका सुरू झाल्यावर हे वेगळंच जग माझ्यासमोर उभं राहिलं.” अभिनयाची आवड आणि अभिनयाची उत्तम जाण यामुळे आज शिवानीने स्वतःची अशी एक वेगळी ओळख मराठी इंडस्ट्रीत निर्माण केली आहे. शीतली आजही लोकांच्या मनात आहे आणि ती कायम राहणार यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER