कोरोनामुळे अनाथ झालेल्यांच्या भवितव्याला आकार देण्याचे काम आपले : सुप्रिया सुळे

Supriya Sule

मुंबई : कोरोनाने (Corona virus) देशभरात थैमान घातले आहे. आता काहीशी परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, या महामारीमुळे अनेक मुलांचे आई-वडील दगावले. अशा मुलांना आधार देण्याची गरज आहे. अनाथ (orphans) झालेले एकही मूल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विटसुद्धा केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे. घरातील कमावत्या पालकाचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्नदेखील प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यांचे शिक्षण, आरोग्य इत्यादींची काळजी घेणे आवश्यक आहे.” असे त्या म्हणाल्या. “यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता असून केंद्र व राज्यांनी परस्पर सामंजस्याने व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. मुलं देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारीदेखील आहे. याबाबत सकारात्मक विचार करावा.” अशी विनंती सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.


केंद्राची घोषणा
दरम्यान, कोरोनाकाळात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने’अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या १८व्या वर्षी ‘मासिक सहायता राशी’ आणि वयाच्या २३व्या वर्षी ‘पीएम केअर्स’मधून १० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. याशिवाय मुलांना मोफत शिक्षण देण्यावरही भर दिला जाणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ‘पीएम केअर्स फंडा’तून कर्जही दिले जाईल. या मुलांना वयाच्या १५व्या वर्षापर्यंत ‘आयुषमान भारत योजने’अंतर्गत पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमाही दिला जाणार आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button