जितू …. कुठे आहेस?

Jitendra Joshi

माणसाला सर्वात जास्त त्याचे आई-वडील ओळखत असतात हे तर नक्कीच खरं आहे. पण एका ठराविक वयानंतर आपले जीवश्चकंठश्च मित्र आपली नस समजून घेत असतात. मग ते सेलिब्रिटी कलाकार असले तरी त्यांच्या सवयींवर त्यांचे मित्र अधिक अधिकाराने बोलू शकतात. अशाच मित्रांच्या ताफ्यात नेहमीच रमणारा अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याचा त्याचे मित्र नेहमीच खरपूस समाचार घेत असतात ते त्याच्या वेगवेगळ्या सवयी मुळेच. एका मुलाखतीच्या निमित्ताने जितेंद्रच्या मित्राने त्याच्या या खोड्या कॅमेरासमोर सांगितल्या आणि मग काय जितेंद्रच्या चाहत्यांना चांगलेच खाद्य मिळाले.

जितेंद्रचे मित्र त्याला , कुठे आहेस? असा साधा सरळ प्रश्न विचारतात तेव्हा , चार दिवसापूर्वी कुठून आलो, आणि आत्ता काय करत आहे, पुन्हा कुठे जाणार आहे , त्यानंतर काय प्लॅन्स आहेत अशी सगळी सुफळ संपूर्ण गोष्ट सांगतो आणि म्हणूनच त्याच्या अनेक मित्रांनी त्याला कुठे आहेस असा प्रश्न विचारणे बंद केला आहे.

नायक, खलनायक, विनोदी अभिनेता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभिनयामध्ये सहज सुंदर मुशाफिरी करणारा कलाकार म्हणजे जितेंद्र जोशी. मराठी इंडस्ट्रीमध्ये जितेंद्र हा जितू, जित्या या नावाने त्याच्या मित्र मंडळीच्या वर्तुळात फेमस आहे. त्याने काही हिंदी सिनेमातही काम केले यामध्ये सिंघम रिटर्न्ससारखा सुपरहिट सिनेमाही आहे. सुरुवातीला त्याला भेटणारा प्रत्येक जण जितेंद्र अशी फॉर्मल हाक मारतो, मात्र जितेंद्रचा मिश्कील स्वभाव पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडून कधी जितू अशी हाक येते हे त्याचे त्यालाही कळत नाही. जितेंद्रच्या स्वभावातील अनेक कंगोरे त्याच्या मित्रांना चांगलेच माहीत आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे जितू प्रचंड बोलतो. त्याला कुठलीच गोष्ट कमी शब्दात मांडता येत नाही. अर्थात जितेंद्रदेखील त्याच्या मित्रांकडून येणारी ही गोष्ट तक्रार म्हणून घेत नाही तर कौतुक म्हणूनच घेतो. जितेंद्र सांगतो, हो मी खूप बोलतो. का म्हणून कमी बोलायचं? जर आपल्याला इतकी चांगली वाणी दिली असेल तर आपल्याला भरभरून बोलता आले पाहिजे. काही काही माणसं जेवढ्यास तेवढे उत्तर देणारी असतात. अशी माणसं मला खरंच आवडत नाहीत. विचारलेल्या प्रश्नाचं एखाद दुसऱ्या शब्दांमध्ये उत्तर दिल्यामुळे संवाद कसा भरल्यासारखा होत नाही. जितेंद्र असा फक्त विचारच करत नाही, तर खऱ्या आयुष्यातही तो दिलखुलासपणे बोलत असतो. त्याचा एक मित्र जितेंद्रविषयी सांगताना म्हणतो, जितेंद्रची ही बोलण्याची सवय कधी कधी छान वाटते मात्र कधी कधी जितेंद्र जिथे एक शब्दाचे उत्तरही पुरेसं असतं तिथे अक्षरशः गोष्ट सांगितल्यासारखा बोलतो. एकदा जितेंद्रच्या मित्राने त्याला फोन करून विचारलं की, कुठे आहेस ? खरं तर हाच प्रश्न इतका साधा सरळ सोपा होता की जितेंद्रने जिथे आहे त्या स्थळाचे फक्त नाव सांगायचं होतं. पण उत्तरादाखल जितेंद्रने अमुक अमुक ठिकाणाहून आलो. आता जिममध्ये जायच्या तयारीत आहे. मात्र पुन्हा जीमला जाऊन आलो की काही नव्या प्रोजेक्ट बद्दल मी एकाला भेटणार आहे.

त्यानंतर मला काही फोन करायचे आहेत. त्या फोनवरील संवादामध्ये काही काम निघतील आणि मग पुढच्या चार दिवसात माझं प्रवासाचे नियोजन होणार आहे. प्रवासाहून आल्यानंतर मग मात्र मी फ्री आहे. इतकं सगळं बोलत असताना जितू शेवटी तो सध्या त्या क्षणी कुठे आहे हे सांगतच नाही. त्यामुळे आम्ही मित्रांनी त्याला फोन केल्यानंतर कुठे आहेस असं विचारायचं नाही हा पणच केला आहे असं म्हटलं तरी चालेल. मात्र जितू मित्रांच्या या गोंडस तक्रारीवर तेवढ्याच दिलखुलासपणे हसून घेतो.

जितेंद्र मात्र त्याच्या जास्त बोलण्याच्या सवयीचं समर्थनच करतो. त्याला असं वाटतं की, आजच्या काळामध्ये एकमेकांशी बोलणं हेच कुठेतरी दुरापास्त होत चालले आहे. आज-काल एकमेकांची चौकशी केली की नसत्या चौकशा कशाला हव्यात असा त्याचा अर्थ काढला जातो. पण जेव्हा तुम्ही एकमेकांशी खूप बोलाल, एकमेकांविषयी जाणून घ्या तेव्हाच खरेतर दूर चाललेली माणसं जोडली जातील असं त्याला वाटतं. एकतर जितू हाडाचा कवी आहे. बसल्याबसल्या त्याला कविता सुचतात. त्याचेही कारण तो त्याच्या बोलघेवड्या स्वभावाला देतो. त्याने आयुष्यात अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. अनेक अनुभव पचवले आहेत. ज्या काळामध्ये माणसांनी आपल्याशी बोलावं असं वाटत होतं तेव्हा आपल्या गरीबीमुळे अनेक माणसांनी आपल्याला झिडकारलं हा अनुभव खूप वेदना देणारा होता. आणि म्हणूनच मी मित्रांशी , सहकारी कलाकारांशीच नव्हे तर मला कोणताही माणूस कुठेही भेटला तरी त्याच्याशी प्रचंड गप्पा मारतो. माझे मित्र जरी माझ्या खूप बोलण्यावर आक्षेप घेत असले तरी माझं शांत राहणे माझ्या मित्रांना आवडत नाही. मला वाटतं मी बोलावं, बोलत राहावं असं त्यांना वाटत असतं. हा, मला आता एखाद-दुसऱ्या शब्दात उत्तर देता येत नाही. मला एखाद्याने प्रश्न विचारला कि त्याचं साग्रसंगीत उत्तर द्यायला खूप आवडतं. मला असलेल्या भाषणाच्या आवडीतून कविता करण्याची आवडीतूनच कदाचित माझा हा बोलघेवडा स्वभाव बनला असेल. पण मला बोलायला आवडतं हे मात्र नक्की.

कॉलेजमध्ये असतानाच जितेंद्र जोशीला अभिनयाची आवड लागली आणि त्यानंतर त्याने काही नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एक नाटक करत असताना समोर मोहन वाघ ही नाट्य वर्तुळातील दिग्गज व्यक्ती बसली होती आणि त्यांच्या नजरेने जितुमधील अभिनयाचं कौशल्य अचूक हेरलं आणि त्यानंतर मोहन वाघांनी थ्री चिअर्स नाटकाची ऑफर दिली हाच जितेंद्रचा आयुष्यातील अभिनय क्षेत्रात येण्याचा टर्निंग पॉइंट ठरला. प्राण जाये पर शान ना जाये, हम तो तेरे आशिक है ,दोन स्पेशल यासह अनेक नाटकांमध्ये जितूच्या अभिनयाची छाप पडली आहे.

खरं तर अत्यंत सर्वसामान्य आणि आर्थिक पाठबळ असलेल्या घरात जितूचा जन्म झाला आणि त्यामुळेच शाळा कॉलेज करत असताना वर्तमानपत्र विकून, इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करून त्याने घरखर्चाला हातभार लावला आहे. आयुष्याकडे एका संवेदनशील दृष्टीने पाहण्याची जाण त्याला त्याच्या आयुष्यातील याच प्रसंगांनी दिली. आणि म्हणूनच त्याच्या कवितादेखील डोळ्यात पाणी आणणाऱ्या असतात. दोन स्पेशल हा त्याचा शो पाहताना त्यांच्यातील ही संवेदनशीलता पदोपदी जाणवते. नायक, खलनायक आणि विनोदवीर या अभिनय प्रकारात अत्यंत चपखलपणे स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या जितेंद्र जोशी याच्या भोवती मित्रांचा भला मोठा ताफा आहे. कधी एकमेकांची फिरकी घेत तर कधी एकमेकांना आधार देत त्यांचं हे मित्रमंडळींचे समृद्ध वर्तुळ हाच जितूच्याही जगण्याचा उर्जास्त्रोत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER