जितूने मारला खोवा रोटीचा फडशा

jitendra Joshi

कितीही चांगल्या हॉटेलमध्ये एखादा पदार्थ खाल्ला किंवा देशोदेशीच्या कितीही चवी चाखल्या तरी प्रत्येकासाठी त्याच्या आईच्या हातची चव ही जगातली सगळ्यात स्वादिष्ट असते. अनेकांना आईच्या हातचा वरण-भात सुद्धा जगातील सगळ्यात चवीची डिश वाटते. यात काही खोटं नाही. प्रत्येकाला आपण विचारलं की त्याला त्याच्या आईच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो तर प्रत्येक व्यक्तीकडे खास उत्तर असतं. अभिनेता जितेंद्र जोशी यांच्याकडेही त्याच्या आईच्या हातचा असा पदार्थ आहे जो तो कधीही आणि कुठेही खाण्यासाठी तयार असतो. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ म्हणजे खोवा रोटी. नुकताच जितूने त्याच्या आई सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे त्याच्यामध्ये तो आणि त्याची आई मिळून खोवा रोटी बनवत आहेत आणि धम्माल मज्जा मस्ती करत ही खोवा रोटी तयार होते आणि त्यानंतर जितू त्या रोटीचा अक्षरशः फडशा पाडतो.

जितेंद्र जोशी हे नाव म्हणजे प्रयोगशील अभिनय करणाऱ्यांच्या यादीत एक महत्त्वाचे नाव म्हणून घेतले जातं. जितू या नावाने मराठी इंडस्ट्रीमध्ये परिचित असलेला जितेंद्र जोशी हा सतत नवनवीन प्रयोग त्यांच्या कामामध्ये करत असतो. मग ती मालिका असो नाटक असो सिनेमा असो किंवा आजच्या काळातलं प्रभावी माध्यम म्हणजे वेबसीरिज असो. अभिनय लेखन दिग्दर्शन यासोबतच जितेंद्र जोशी याने निवेदन या क्षेत्रातही भरारी घेतली आहे. त्याचा दोन स्पेशल हा शो खूप गाजला होता यामध्ये तो मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमधील 2 स्पेशल व्यक्ती निवडून त्यांच्याबरोबर दिलखुलास बातचीत करायचा. सध्या तरी हा शो ऑफ एअर गेला असला तरी जितूकडे असलेलं मुलाखत कौशल्य या शोच्या माध्यमातून समोर आलं. काकण सिनेमात त्याने वठवलेला जख्ख म्हातारा ही भूमिका देखील खूप गाजली होती.

जितेंद्र जोशी मे पोस्ट केलेला व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खोवा रोटी तर बनत आहेच पण त्यासोबत जितू आणि त्याच्या आईचं नातं किती घट्ट आहे हे देखील दिसत आहे. मस्त गाणी म्हणत रोटी कशी बनवायची हे जितुने हिडिओमधून सांगितलं आहे. जितू सांगतो, हा असा पदार्थ आहे ज्यामध्ये गव्हाचं पीठ , ओवा तसच हळद असेच आरोग्याला सकस असलेले पदार्थ घातले जातात. लहानपणापासून मी आईच्या हातचा हा पदार्थ खात आलेलो आहे. अत्यंत कौशल्याने आणि निगुतीने करण्याचा हा पदार्थ असल्यामुळे हा पदार्थ बनवण्यात आई अगदी निष्णात झालेली आहे. तसा खूप कमी घरांमध्ये खोवा रोटी पदार्थ बनतो त्यामुळे कुठेतरी काळाच्या ओघात मागे पडणारा हा पदार्थ लोकांना समजावा आणि या निमित्ताने माझ्या आईच्या हातची चव चाखायला मिळावी म्हणून आम्ही दोघांनी मिळून मिशन खोवा रोटी फत्ते केलं.

कॉलेजमध्ये असतानाच जितेंद्र जोशीला अभिनयाची आवड लागली आणि त्यानंतर त्याने काही नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एक नाटक करत असताना समोर मोहन वाघ ही नाट्य वर्तुळातील दिग्गज व्यक्ती बसली होती आणि त्यांच्या नजरेने जितुमधील अभिनयाचं कौशल्य अचूक हेरलं आणि त्यानंतर मोहन वाघांनी थ्री चिअर्स नाटकाची ऑफर दिली हाच जितेंद्रचा आयुष्यातील अभिनय क्षेत्रात येण्याचा टर्निंग पॉइंट ठरला. प्राण जाये पर शान ना जाये, हम तो तेरे आशिक है ,दोन स्पेशल यासह अनेक नाटकांमध्ये जितूच्या अभिनयाची छाप पडली आहे.

खरं तर अत्यंत सर्वसामान्य आणि आर्थिक पाठबळ नसलेल्या घरात जितूचा जन्म झाला आणि त्यामुळेच शाळा कॉलेज करत असताना वर्तमानपत्र विकून, इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करून त्याने घरखर्चाला हातभार लावला आहे. आयुष्याकडे एका संवेदनशील दृष्टीने पाहण्याची जाण त्याला त्याच्या आयुष्यातील याच प्रसंगांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER