जितेंद्र देणार ‘गोदावरी’ची भेट

Godavari

गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक अभिनेते निर्मितीकडे वळत आहेत. अभिनयाच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर आपली कारकीर्द घडवल्यानंतर आता त्यापैकी अनेक अभिनेते कलाकार कॅमेऱ्याच्या मागे जाऊन निर्मितीची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. अशाच अभिनेत्यांपासून आता निर्माते बनलेल्या कलाकाराच्या पंक्तीत अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) म्हणजेच मराठी इंडस्ट्रीमधला जितू सिनेमा निर्मितीमध्ये उतरला आहे. गोदावरी (Godavari) नावाचा सिनेमा घेऊन जितेंद्र जोशी निर्मात्याच्या भूमिकेत लवकरच त्याच्या चाहत्यांना ही भेट घेऊन येणार आहे. महाराष्ट्रदिनी अर्थातच एक मेला त्याची निर्मिती असलेला गोदावरी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सध्याची जितू या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला जितेंद्र जोशी हा एक वेगळ्या धाटणीचा अभिनेता आहे. सतत काहीतरी वेगळं करण्याचा त्याला ध्यास असतो हे त्याच्या आजपर्यंतच्या भूमिकांमधून प्रेक्षकांना दिसले आहे. मुळात जितेंद्र जोशी हा कवी मनाचा माणूस आहे. वेगळ्या पद्धतीचे लेखन करण्यामध्ये त्याला नेहमीच स्वारस्य असतं. आजपर्यंत त्याने केलेल्या विविध भूमिकादेखील त्याच्या चोखंदळ वृत्तीचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाहीत. कंकण सिनेमामध्ये त्याने वठवलेली जख्खं म्हातार्‍याची भूमिका अप्रतिम होती. त्यातून त्याने त्याच्या अभिनयाचं दर्शन घडवलं होतं. केवळ नायक या चौकटीत अडकण्यापेक्षा जितू जोशी हा नेहमीच अभिनयाला कंगोरे देणाऱ्या भूमिका निवडत आला आहे. अभिनयासोबत एक उत्तम निवेदक आणि सूत्रसंचालक अशीदेखील जितेंद्र जोशी याची ओळख आहे. याशिवाय त्याने आजपर्यंत अनेक कार्यक्रमांची संहिता देखील लिहिली आहे. शीघ्र कवी असा त्याचा स्वभाव असून त्यामुळेच त्याच्या अविर्भावामधला मिश्किलपणा नेहमीच त्याच्या इंडस्ट्रीमधला मित्र मंडळींना आपलेसे करुन घेत असतो. त्याच्या दोन स्पेशल या शोला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मराठी सिनेमा , नाटक, मालिका या क्षेत्रातील दोन व्यक्तींना निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधणारा हा दोन स्पेशल नावाचा शो जितेंद्रच्या हजरजबाबीपणामुळेच खऱ्या अर्थाने लोकप्रिय ठरला आहे. रंगभूमीवरही त्याने अभिनयाची कमाल दाखवली आहे. असा कॅमेऱ्यासमोर नेहमीच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खिळवून ठेवणारा जितेंद्र जोशी आता कॅमेऱ्याच्या मागे अर्थातच निर्मात्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

गोदावरी या सिनेमाच्या माध्यमातून जितू निर्माता जरी झाला असला तरी या सिनेमात नायकाची भूमिका देखील साकारणार आहे. त्याच्यासोबत या सिनेमामध्ये गौरी नलावडे स्क्रिन शेअर करणार आहे. त्याच्या सोबत नीना कुळकर्णी आणि विक्रम गोखले हे कलाकार देखील पडद्यावर दिसणार आहेत.

जितू सांगतो, बऱ्याच दिवसांपासून सिनेमा निर्मिती करण्याचा विचार डोक्यात घोळत होता. मला नेहमीच कुठलेही काम करत असताना त्याचा पूर्ण अभ्यास करून आणि पूर्ण तयारी करून ते काम हाती घ्यायला नेहमीच आवडतं. आपल्याकडून जी गोष्ट सादर केली जाणार आहे ती त्या माध्यमाच्या परिपूर्णतेची झलक असावी असा माझा नेहमीच आग्रह असतो. त्यामुळेच केवळ निर्माता बनायचं म्हणून मी घाई न करता एका वेगळ्या विषयाच्या शोधात होतो. आणि गोदावरी या सिनेमाच्या माध्यमातून मला की कथा, ही मांडणी हे सगळ मिळालं आणि त्यामुळेच मी या सिनेमाच्या निर्मितीचा निर्णय घेतला. ही कौटुंबिक कथा आहे आणि एका वेगळ्या कुटुंबाच्या कथेची मांडणी या सिनेमांमधून केली आहे. सध्यातरी मला या सिनेमाविषयी फार काही बोलता येणार नाही पण बऱ्याच दिवसात अशा प्रकारचा कुटुंबवत्सल सिनेमा पडद्यावर आलेला नाही. त्यामध्ये खूप सार्‍या भावनिक गुंतवणुकीची विण गुंफलेली आहे. प्रत्येक माणूस हा कितीही त्याच्या त्याच्या क्षेत्रांमध्ये व्यस्त असला तरी त्याला बांधून ठेवणारे हे त्याचे कुटुंब असतं. विशेष म्हणजे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आपण ज्या एका विचित्र परिस्थितीशी सामना करत आहोत, कोरोनासारख्या महामारीशी लढत आहोत अशा परिस्थितीमध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचं कुटुंब हे किती महत्त्वाचं आणि दृढ आहे हे प्रत्येकाला कळून चुकलं. याच विचारावर आधारित गोदावरी सिनेमा बेतलेला आहे. आणि म्हणूनच मला या सिनेमाच्या निर्मिती मधून एक वेगळाच आनंद देखील मिळणार आहे.

जितेंद्र जोशी निर्माता म्हणून त्याच्या चाहत्यांना या नव्या सिनेमाच्या रूपाने भेटणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते देखील खूप उत्सुक आहेत. साहजिकच या सिनेमामध्ये निर्माता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेमध्ये जितू काम करणार असल्यामुळे त्याच्यावर देखील एक वेगळी जबाबदारी आहे. नक्कीच हा सिनेमा जितेंदच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER