भाजपात जाऊन परत येणाऱ्यांना दोन वर्षे वेटिंगवर ठेवा- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

ठाणे : राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले जे कार्यकर्ते राष्ट्रवादीत परत येणार आहेत त्यांना किमान दोन वर्षे वेटिंगवर ठेवा, असे परखड मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते. सत्तेसाठी येण्यापूर्वी त्यांना चटके सोसू द्या, कारण राष्ट्रवादी ही काही खानावळ नाही, असं संतापजनक मत आव्हाड यांनी व्यक्त केलं. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते.

२०१४ साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले; पण आता ते राष्ट्रवादीत पुन्हा परत येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काहींनी प्रवेशही केला. मात्र जे कार्यकर्ते संकटकाळात पक्षासोबत खंबीरपणे उभे होते, त्यांनाच पक्ष पहिलं प्राधान्य देईल, असं आव्हाड म्हणाले. कार्यकर्त्यांना पक्षात घ्या, पण त्यांना किमान दोन वर्षे कुठलंही पद देऊ नका. सत्तेच्या सावलीसाठी जे तिकडे गेले त्यांना आता परत सत्तेच्या सावलीत याचचं असेल, तर आधी चटके सोसू द्या. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही काही खानावळ नाहीये, असं परखड मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. ही सत्ता आणण्यासाठी पवारसाहेबांनी मोठे परिश्रम आणि त्याग सोसल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेल्या गणेश नाईक यांच्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता बोचरी टीका केली. पूर्वीचं जिल्ह्यातलं नेतृत्व आणि आताचं नेतृत्व यांच्यात फरक आहे. आताचं नेतृत्व कुणाच्याही घरी मटण-भाकरी खायला जाणार नाही. जाईल तर आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरी जाईल. त्यामुळं जिल्ह्यातलं जेवणाचं राजकारण बंद झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER