
मुंबई : सध्या महाराष्ट्रात फोन टॅपिंगप्रकरणाची (Phone tapping) चर्चा चांगलीच गाजत आहे. या प्रकरणामुळे केंद्रस्थानी असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आरोप केला आहे. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर (Rajendra Yadravkar) यांना भाजपसोबत (BJP) राहण्यासाठी धमकावले होते, असे आव्हाड यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे आरोप केला आहे. अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपात रहावे, यासाठी रश्मी यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी यांनी त्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. रश्मी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे आव्हाड यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे आता रश्मी शुक्ला आणि भाजपकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर कोण?
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत. महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
रश्मी शुक्ला रडल्या होत्या : आव्हाड
रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजले तेव्हा आपण पकडलो गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर रश्मी मुख्यमंत्र्यांकडे रडल्या. नंतर त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करू नये, अशी विनंती केली. महाविकास आघाडी सरकार दिलदार आहे. त्यामुळे मोठे मन करून मविआ सरकारने रश्मी शुक्ला यांना माफ केले. मात्र, याच रश्मी शुक्ला नवे बदनामीचे षडयंत्र रचतील, हे माहिती नव्हते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.
अजून पुरावे काय पाहिजेत.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 25, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला