जितेंद्र आव्हाडांनी विरोधी उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यदसाठी गायलं हे खास गाणं

मुंबई : कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद असा सामना येथे रंगणार आहे. अभिनेत्री दीपाली सय्यदने आजच मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधून शिवसेनाप्रवेश केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढली. मात्र कालच्या वेळेअभावी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया त्यांनी आज पूर्ण केली. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या विरोधात उभा केलेल्या उमेदवार दीपाली सय्यद यांच्यासाठी खास गाणे गाऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

“बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससुराल में इतना प्यार मिले” हे गाणं आव्हाडांनी गायलं. १५ दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण आमच्या मानवी धर्माप्रमाणे तिचं खूप औक्षण होईल, तिला खूप माया दिली जाईल आणि त्यांनतर दीड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्थादेखील केली जाईल, असेदेखील आव्हाड म्हणाले.