मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करणाऱ्या आराध्याला आव्हाड म्हणाले…

Jitendra Awhad - Aradhya Video

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आणि देशासमोर नवं संकट उभं झालं आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाय योजना राबवत आहे. या अभूतपूर्व संकटाच्या काळात अनेक संस्था, संघटना, उद्योजक सरकारच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यातच मदत कार्यात एक चिमुरडीही सहभागी झाली आहे. मदतीनं भारावून गेलेल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आराध्याचं कौतुक करायचा मोह आवरला नाही.

कोरोनाच्या लढाईत ट्रम्प यांनी मागितली मोदींची मदत

कोरोनाच्या लढ्यात थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने सोलापूरच्या ७ वर्षांच्या आराध्यानं मुख्यमंत्री सहायता निधीत दहा हजार रुपयांची मदत केली आहे. आराध्यानं आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत ही १० हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली.

सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आराध्याचं कौतुक केलं आहे. “सोलापूरची ७ वर्षांची आराध्या जिने वाढदिवस साजरा न करता करोनाशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तिने जमा केलेले १०,००० रुपये दिले. आराध्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला निरोगी आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना,” असं शब्द आव्हाड यांनी आराध्याचं कौतुक केलं आहे.