आमच्या जीवाला धोका; जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

Jitendra Awhad-Vijay Vadettiwar-CM Uddhav Thcakeray

मुंबई : महाविकास आघाडीची गाडी आता कुठे रुळावर आलेली दिसत असताना मंत्रिमंडळातील नेते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आमच्या जीवाला धोका आहे, आमच्या सुरक्षेत वाढ करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (५ फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणतात –
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आपल्या घराचीही रेकी करण्यात आली होती. मात्र भाजप सरकारने आवश्यक सुरक्षा पुरवली नव्हती. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका पाहता, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

जितेंद्र आव्हाड सांगतात –
मंत्रिमंडळ बैठकीत हिंगणघाट जळीतकांडसह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा उपस्थित केला. मागील सरकारने त्यांची सुरक्षाव्यवस्था कमी केली होती. तसंच दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर काही संघटनांनी त्यांच्या घराचीही पाहणी केल्याचे पुरावे समोर आले होते. त्यामुळे काही कट्टर संघटनांचे हेतू लक्षात घेता आपली सुरक्षा वाढवावी, असे आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या अहवालात काही आढळल्यास यासंदर्भात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अजित पवारांवर बरसणारा भाजपाचा मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात