दागिने चोरीची भिती घालून वयोवृद्धेला लुटले

Jewelry robbed the veteran with fear of theft

मुंबई :- दागिने चोरीची भीती घालत ठगांनी एका वयोवृद्धेच्या अंगावरील दागिने लुटल्याची धक्कादायक घटना पेडर रोड परिसरात घडली. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन ताडदेव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

ताडदेवमधील एम. पी. मिल परिसरात राहात असलेल्या चंद्राबाई महाडीक या 65 वर्षीय वयोवृद्धा पेडर रोड परिसरात घरकाम करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी ते काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाल्या फार्जिट हिल रोडवरुन घराच्या दिशने जात असताना मोटार सायकलवरून आलेल्या तिन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. तिघांनीही त्यांना दागिने चोरीची भीती घालून बोलण्यात गुंतवत अगंवरील दागिने काढण्यास सांगितले.

तिघांच्या बोलण्याने घाबरलेल्या महाडीक यांनी अंगावरील 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि 10 ग्रॅम वजनाची बोरमाळ काढली. त्या तिघांनीही हे दागिने प्लास्टीकच्या पिशवीत ठेवण्याचा बहाणा करत हातचलाखीने हे दागिने लंपास करुन तेथून काढता पाय घेतला. तिघेहनी निघून गेल्यानंतर महाडीक यांनी पिशवी उघडून बघितली असता त्यात दागिने नव्हते. आपली फसवणूक झाल्याची खात्री पडल्याने त्यांनी घडलेला प्रकार कुटूंबियांच्या कानावर घालत ताडदेव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.