जेट एअरवेज संकटाच्या दरीत

एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांचा रामराम

Jet Airways In the valley of crisis

मुंबई : आर्थिक संकटामुळे सेवा ठप्प केलेली जेट एअरवेज संकटाच्या दरीत कोसळली आहे. मनःस्तापाला कंटाळून तीन उच्चधिकाऱ्यांनी एकाच दिवशी राजीनामा दिला आहे. यापैकी दोघेह कंपनीचे निर्णयकर्ता होते..

विनय दुबे यांची २०१७ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ पासून कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली. १७ एप्रिलला सेवा ठप्प झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांची बाजू ते सातत्याने स्टेट बँकेसमोर मांडत होते. पण कंपनी पुन्हा उभे होणे अशक्य असल्याच्या शक्यतेने त्यांनी अखेर मंगळवारी राजीनामा दिला.

अमित अग्रवाल हे कंपनीचे उप सीईओ व मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) म्हणून कार्यरत होते. कंपनी आर्थिक चणचणीत असतानाही १७ एप्रिलपर्यंत उड्डाण सुरू ठेवण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. पण त्यांनीही अखेर मार्ग निघत नसल्याने वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला. याखेरीज कंपनी सचिव असलेले कुणाल शर्मा यांनीही मंगळवारीच त्यागपत्र दिले.

कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दुबे यांच्याकडे दाद मागण्याची सोय होती. पण सीईओ व उप सीईओ या दोघांनीही राजीनामा दिल्याने दाद मागावी कुठे? असा गंभीर प्रश्न आता कर्मचाऱ्यांसमोर आहे.