जीन्स पँट घालून येता येईल मंत्रालयात

Jeans can be worn in the ministry - Maharastra Today

मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रालयात शेकडो कर्मचारी, अधिकारी काम करतात. त्यांचा ड्रेस कोड काय असावा याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने ८ डिसेंबर रोजी काढला होता. आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. या आधी जीन्स पँट घालण्यास मनाई करण्यात आलेली होती. मात्र आता त्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

या आधीच्या आदेशानुसार जीन्स पँट आणि टी शर्ट घालण्यास मनाई केलेली होती. आता फक्त टी शर्ट घालण्यास मनाई असेल. जीन्स पँट घालून कर्मचारी, अधिकाऱ्यांना मंत्रालयात जाता येईल. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार/चुडीदार, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पँट /ट्राऊझर असा पेहराव करावा असा आदेश ८ डिसेंबर रोजी काढण्यात आला होता. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ड्रेस कोडचे स्वागत केले होते; पण जीन्स पँटला मनाई करण्यात आल्याबद्दल नाराजीचा सूर उमटला होता. आता त्याची दखल घेत जीन्स पँटला अनुमती देण्यात आली आहे.

महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शक्यतो चपला, सॅन्डल, बूट यांचा वापर करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी बूट, सॅन्डलचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच कंत्राटी तत्त्वावर नियुक्त कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून कामासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही हा ड्रेस कोड लागू असेल.

गुजरात विधानसभेत टी शर्ट घालून आलेले काँग्रेसचे आमदार विमल चुडासामा यांना सोमवारी विधानसभा अध्यक्षांनी सभागृहातून बाहेर काढले होते आणि सोशल मीडियात त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटली होती. खरे तर गुजरातमधील आमदारांसाठी कोणताही ड्रेस कोड निश्चित केलेला नसताना अध्यक्षांनी टी शर्ट घालून आलेल्या आमदारास बाहेर का काढले, असा सवालही उपस्थित झाला होता. महाराष्ट्रातील आमदारांसाठी मंत्रालयात वा विधानसभेत येण्यासंदर्भात कुठलाही ड्रेस कोड निश्चित केलेला नाही. कर्मचारी, अधिकाऱ्यांना ड्रेस कोड तर मग लोकप्रतिनिधींसाठी का नाही, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER