जयंत पाटलांकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न, शिवसेना नेत्याची उद्धव ठाकरेंकडे तक्रार

jayant Patil & Uddhav Thackeray

सांगली : राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये सगळं आलबेल असल्याची ग्वाही नेते देत असतात. मात्र, या आघाडीत धुसपुस सुरूच असते हे अनेकदा लक्षात आले आहे. राज्य पातळीवर हे मतभेद नसले तरी स्थानिक पातळीवरची धुसपुस कायम आहे. कारण, सांगली जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची तक्रार केली आहे.

जयंत पाटील राज्य सरकार व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आहेत. जिल्ह्यात शिवसेना पक्षाला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिले जाते, असा आरोप संजय विभुते यांनी केला आहे. तसंच जिल्ह्यात शिवसेनेचा एकमेव आमदार असून त्याचे देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप विभुते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपलं सविस्तर म्हणणं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकतीच शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची ऑनलाईन बैठक घेतली. संघटनात्मक अनेक बाबींवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. यावेळी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटलांकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय’, अशी तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विभुते यांनी दिली.

सांगलीचे पालकमंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री म्हणून जयंत पाटील पोलीस दलाला आणि प्रशासनाला हाताशी धरुन शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेली महाविकास आघाडी ही विरोधकांना दमवण्यासाठी आहे, त्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी आहे. पण आमच्याकडे असणारी महाविकास आघाडी ही शिवसेनेला दाबण्यासाठी आहे की काय? असा प्रश्न आम्हाला पडला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विभुते यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवर समन्वयाची बैठक पार पडत असते. मात्र गेल्या महिन्यामध्ये एकही समन्वयाची बैठक झालेली नाही. शासकिय कमिट्यांमध्ये देखील शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही, अशा अनेक व्यथा आम्ही उद्धव ठाकरेंसमोर मांडल्याचं’ विभुते यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER