जयंत पाटील यांच्या फडणवीस यांना दिल्ली वारीसाठी शुभेच्छा

jayant patil and devendra fadnavis

कोल्हापूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे आम्हाला आनंद झाला. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत, हे यातून स्पष्ट होत आहे. त्यांच्या दिल्लीतील कामाला शुभेच्छा आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असली, तरी महाविकास आघाडी अभेद्य आहे. आमच्यामध्ये कोणतीही धुसफूस नसल्याचा दावाही ना. पाटील यांनी यावेळी केला.

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्या उद्घाटनासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भय्याजी जोशी यांनी फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेतेपदी राहणार नाहीत, ते माजी मुख्यमंत्रीही राहणार नाहीत असं सूचक विधान केलं होतं. त्यावर फडणवीस यांच्या दिल्लीतील कामाला आमच्या शुभेच्छा असल्याचे पाटील म्हणाले.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. दोन्ही कायद्यांविषयी त्यांच्या भूमिकेवर मला बोलता येणार नाही. मात्र राज्यात महाविकास आघाडी अभेद्य असून कोणतीही धुसफूस नाही. कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या समांतर तपासाबद्दलचा निर्णय कागदोपत्री झालाय की नाही याबाबत माहिती नाही. दररोज माध्यमासमोर येवून कोणीही बोलत आहे. असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाही : भैय्याजी जोशी