जयंत पाटील, विश्वजित कदम यांची सांगलीत राजकीय कसोटी

Sangli Vidhan Sabha

धनवंतांचा जिल्हा अशी ओळख असलेला सांगली जिल्हा हा वर्षानुवर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण आज ती ओळख क्षीण होत चालली आहे. गेल्या २० वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात बऱ्यापैकी बस्तान बसविले खरे पण गेल्या पाच-सात वर्षांत भाजपने एकेक सत्ताकेंद्रामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला जबर धक्के दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वरचष्मा असलेल्या सांगली महापालिकेत भाजपने निर्भेळ यश संपादन केले. मराठा आरक्षणाचे आंदोलन जोरात असताना पाटलांची महापालिका भाजपकडे गेली.  पायाखालची वाळू सरकत असल्यासारखे पाटील यांचे गेली काही वर्षे होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.

यापूर्वी इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणी उत्साहाने पुढे येत नसे. आजही मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. साखर कारखान्यांसह उद्योगांचे मोठे जाळे त्यांच्याकडे आहे. असे असले तरी त्यांच्या विरोधात भाजपकडून लढण्याची तयारी अनेकांनी दाखविली आहे. त्यात नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी, युवक नेते गौरव नायकवडी, नगरसेवक विक्रम पाटील, माजी जि.प.सदस्य भीमराव माने आदींचा समावेश आहे. शिवसेनेकडेही इच्छुकांची गर्दी आहे.

जयंत पाटील यांच्याइतकेच जिल्ह्यातील दुसरे दमदार नाव म्हणजे विश्वजित कदम. माजी मंत्री दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांचे ते चिरंजीव. पलूस-कडेगावमध्ये विश्वजित हे वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झाले. यावेळी अर्थातच त्यांचा मुकाबला भाजपशी असेल. वडिलांची पुण्याई, घराण्याचे साम्राज्य आणि जनसंपर्क या कदम यांच्या जमेच्या बाजू. त्यांच्या विरुद्ध भाजपतर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उमेदवार असतील. जिल्हा भाजपचे अध्यक्ष आ.पृथ्वीराज देशमुख संग्रामसिंह यांच्याशी भक्कमपणे उभे आहेत. आघाडी झाली वा न झाली तरी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुणअण्णा लाड किंवा शरद लाड रिंगणात असण्याची शक्यता आहे. तसे झाले तर लढत तिहेरी होईल आणि कदम यांची डोकेदुखी वाढेल पण कदम यांचेच पारडे जड असेल.

सांगली शहर मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचे सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल. स्वच्छ चारित्र्य आणि मोठ्या प्रमाणात केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. काँग्रेसतर्फे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील लढत देतील. गेल्या पाच वर्षांत त्यांनी विविध उपक्रम, आंदोलनांच्या निमित्ताने जनसंपर्क राखला आहे. जयश्री पाटील यादेखील इच्छक आहेत. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असेल.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधीच जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांना खा.संजय पाटील यांनी भाजपमध्ये आणताना विधानसभा उमेदवारीचा शब्द दिला होता. तो खासदार खरा करतील का हा प्रश्न आहे. दुसरीकडे खासदारांच्या पत्नी ज्योती पाटील यांचे नाव काही जणांकडून मुद्दाम समोर केले जात असल्याने घोरपडेंच्या गोटात नाराजी आहे.

जतमध्ये विद्यमान आमदार भाजपचे विलासराव जगताप यांची उमेदवारी यावेळी निश्चित आहे. तरीही भाजपचे नेते डॉ.रवींद्र आरळी, माजी सभापती प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तमन्नागौडा पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा विक्रम सावंत उमेदवार असतील. राष्ट्रवादीकडे जागा गेली तर सुरेश शिंदे यांचे नाव आहे.

भाजपचे विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या शिराळामध्ये पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. विकासकामे आणि मोठा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. सम्राट महाडिक, काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख हे दावेदार आहेत. राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास माजी आमदार मानसिंगराव नाईक उमेदवार असतील. मोठा जनसंपर्क हे त्यांबचे बळ आहे.

मिरज या अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आणि शेवटच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले सुरेख खाडे यांची पकड मजबूत आहे. मिरजेत कमळ फुलेल अशी स्थिती आहे. तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे बाळासाहेब होनमोरे, प्रा.सिद्धार्थ जाधव, नगरसेवक योगेंद्र थोरात इच्छुक आहेत.

खानापूर-आटपाडीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे प्राबल्य आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटावा असेही प्रयत्न होत आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा निवडणूक लढून लक्षणीय मते घेतलेले गोपीचंद पाडळकर हे भाजपतर्फे लढणार अशी चर्चा आहे. या शिवाय, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख हेही इच्छुक आहेत.गेल्यावेळी हे चौघेही निवडणूक रिंगणात होते. बाबर यांनी ७० हजारावर मते घेतली पण सदाशिवराव पाटील ५३ हजारावर थांबले. तर इतर दोघांनी ४० हजारावर मते घेतली होती.