देवेंद्र फडणवीस सध्या ज्या पद्धतीने वागत आहेत, ते आम्ही कधीही विसरणार नाही – जयंत पाटील

jayant patil-fadnavis

मुंबई : कोरोनाच्या संकटातही राज्यातील भाजप नेते महाराष्ट्राच्या बाजूने उभे राहिले नाहीत. राज्य सरकार सध्या फक्त कोरोनाच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करत असताना राज्यातील भाजप नेते सरकारमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप करत महाविकास आघाडीने काल देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. मुख्यमंत्री साहाय्यता निधीला एक रुपयाही राज्य भाजपने न देता पी. एम. केअर फंडात पैसे पाठवत आहेत. यावरून भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू असा थेट प्रश्न काल राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा:- फडणवीस यांनी केले महाआघाडी सरकारला बोलके…

तसेच, देवेंद्र फडणवीस सध्या ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यांचे हे वागणे आम्ही कधीही विसरणार नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर केली. दरम्यान, कोरोनाचे संकट महाराष्ट्र योग्य पद्धतीने सांभाळत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संदर्भात महाराष्ट्राचं काम उत्तम चाललं आहे. स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे जयंत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरातच्या ढासळलेल्या व्यवस्थेचे उदाहरण दिले.

त्या तुलनेत महाराष्ट्र चांगलं काम करत असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली. मेअखेर राज्यात १.५ लाख कोरोना रुग्ण असतील, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज होता; परंतु सध्याची स्थिती पाहता हा आकडा ६० हजारांच्या आसपास असेल. राज्य सरकार पूर्ण क्षमतेने व एकत्रितपणे काम करत असल्यानेच हे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असे पाटील यांनी नमूद केले. तसेच, मुंबईची तुलना इतर शहरांशी करून चालणार नाही; कारण मुंबई हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळे कोरोनाचे येथे सर्वाधिक रुग्ण असतील, असेही पाटील यांनी सांगितले. मुंबईत धारावीसारख्या सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात साथ आटोक्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER