बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलवर लगेच विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील

Jayant-Patil-

सिंधुदुर्ग : बिहार विधानसभा निवडणुकीवर आलेल्या एक्झिट पोलवर लगेच विश्वास ठेवण्याची गरज नाही. गेल्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलची आकडेवारी, त्यानंतर अंतिम निकालात आलेली आकडेवारी काय होती, ते संपूर्ण राज्याने बघितली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ते आज कोकण दौऱ्यावर होते. दरम्यान, सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या विविध घडामोडींवर प्रतिक्रिया दिली.

एक्झिट पोल हा अंदाज व्यक्त करणारा असतो. आता घोडामैदान सलाम नाही. त्यामुळे ज्यांच्या बाजूने एक्झिट पोल आलाय त्यांनी हुरळून जाऊ नये. त्याचबरोबर ज्यांच्याविरोधात एक्झिट पोल आहे त्यांनादेखील चिंता करू नये. एक्झिट पोलप्रमाणे निकाल लागतात, असा मला अलीकडच्या काळात अनुभव नाही. त्यामुळे बघू काय होतं ते, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

यावेळी पाटील यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अधिक भाष्य टाळलं. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे. तिच आमची भूमिका आहे. त्यात वेगळं सांगण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. मेट्रो कारशेडबाबत केंद्राने तशी भूमिका का घेतली हे माहीत नाही. तपशीलात जाऊन त्याची माहिती घ्यावी लागेल, असं सांगून त्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य टाळलं.

मराठा आरक्षण प्रश्नी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत त्यांना विचारलं असता मेटेंचं वक्तव्य मी पाहिलेलं नाही. मी हल्ली टीव्हीही पाहत नाही, असं ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. भाजपने याप्रकरणी दिलेले वकीलच खटला लढत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, मराठा समाजाच्या हिताचा प्रश्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, जयंत पाटील यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटक प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. अर्णव गोस्वामी यांना पत्रकारीतेप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णव यांचे नाव आहे. त्यांच्या एकट्याचंच नव्हे तर आणखी दोघांचं त्यात नाव असून त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचं पाटील म्हणाले.

नाईक कुटुंबांनी कोर्टाला विनंती केल्यानंतर कोर्टाच्या परवानगीने हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आहे. पूर्वीच्या सरकराने हे प्रकरण दाबलं होतं. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. खरे तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो. मात्र, पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार झाला, असं सांगतानाच आता पोलिसांना काही धागेदोरे सापडले असतील. त्यामुळे त्यांना अटक केली. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. कायदा सर्वांना समान आहे, असं पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER