सरकारमध्ये खातेबदल होण्याची शक्यता नाही, कुणीही वावड्या उठवू नये : जयंत पाटील

Jayant Patil Maharashtra Today

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये खातेबदल होण्याची कोणतीही शक्यता नाही. काही जणांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या वावड्या उठवण्याचं काम सुरू असल्याचं राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नेहमीप्रमाणेच चर्चा झाली असल्याचेही जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केले.

सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांनीही (Anil Deshmukh) कोणतीही चूक केली नाही. सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA करत आहेत. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही, जे कोणी चुकीचे वागले असतील तर त्यांना शिक्षा होईल, असे सांगत जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारसमोर वेगवेगळे राज्याचे प्रश्न आहेत, वेगवेगळे विषय आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत असतात. त्यांच्याशी चर्चा करत असतात.

पुढे ते म्हणाले की, सरकारमधील खातेबदलाबाबत कोणताही प्रश्न नाही. कोणत्याही परिस्थितीत असे बदल करण्याची आवश्यकता नाही. गृहमंत्रिपदासाठी जयंत पाटील, अजित पवार यांच्या नावांची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “नावं अनेकांची चर्चेत येऊ शकतात. नावं आली म्हणजे खातेबदल होईल असे नाही. तसेच अशी नावांची चर्चा करण्याची आवश्यकताही नाही. आमचे गृहमंत्री अनिल देशमुखच राहणार. अशा वावड्या उठवण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला हिरवा कंदील, यांना हिरवा कंदील. मला वाटतं व्यवस्थितपणे काम सुरू आहे. त्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची आम्हाला खातेबदल करण्याची आवश्यकता वाटत नाही.

ही बातमी पण वाचा : राष्टवादीत मोठी घडामोड; गृहमंत्रीपद अजित पवार अथवा जयंत पाटलांकडे जाण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER