केंद्राने आमच्या हक्काचे पैसे लवकर द्यावे; जयंत पाटलांची मागणी

Jayant Patil

मुंबई :- परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मोठे संकट उभे ठाकले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा करणार आहे. मात्र हे संकट मोठं असल्याने केंद्र सरकारनेही मदत करावी. केंद्राकडून २८ हजार कोटी जीएसटी येणे आहे. केंद्राकडून सगळी राज्ये अपेक्षा करतात, केंद्राने आमचे पैसे दिले नाही म्हणून अपेक्षा करतो. असे म्हणत केंद्राने आमच्या हक्काचे पैसे द्यावे अशी मागणी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यावेळी मुंबईतील पत्रकार परिषदेत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

यावेळी पाटील म्हणाले की, केंद्राकडून अपेक्षा करण्याचे दोन मुद्दे आहेत. नैसर्गिक आपत्ती आली  की, केंद्राने मदत करणे अभिप्रेत आहे; शिवाय देशातील सर्व राज्यांत  आर्थिक स्थिती खराब आहे. जितका महसूल जमा होतो तो सगळा पगारावर जातो. म्हणून आमचा आग्रह आमच्या हक्काचे पैसे केंद्राने लवकर द्यावे, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थिल्लरपणा शोभत नाही, अशी जहरी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता कोणताही मुद्दा राहिला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनीविषयी त्यांनी असं विधान केलं. असे शब्द वापरणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला, असं जयंत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचा आवाज  दाबण्यासाठी जलयुक्त शिवार चौकशी असं कोणी सांगितलं? कॅगने काही तपास केला. फडणवीस यांनी भ्रष्टाचार केला असं आमच्यापैकी कोणीही म्हटलं नाही. त्यांनी अंगाला लावून घेऊ नये. भाजपने चिंता करू  नये, त्यांनी काही केलं नाही तर घाबरू  नये. कॅग रिपोर्ट आला म्हणून चौकशी होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

भाजपचे सरकार असताना पंचनामे केल्याशिवाय कुणाला मदत केली नाही. अगदी घरं पडल्यावरदेखील पंचनाम्याशिवाय मदत मिळालेली नव्हती. जे नुकसान झालं त्याची पाहणी केली पाहिजे, म्हणून पंचनामे करत आहोत. पंचनामे न करता कधीही मदत दिली नाही. अशी मदत दिली असा कोणाचा दावा असेल तर तो सपशेल खोटा आहे. पडताळणी करून नेहमी तातडीची मदत देण्यात आली. कोल्हापूर- सांगलीत पूर आला तेव्हा सरकारच उशिरा आलं. लोकांनी स्वतःच्या ताकदीवर एकमेकांना मदत केली. नंतर शेवटच्या दोन-तीन दिवसांत लोकांना मदत मिळाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

सरकार सक्षमपणे काम करतं. नाकर्तेपणाचा प्रश्न नाही. राज्यात जिथे संकट आले तिथे सरकारने कोरोना काळात काम केले. पवारसाहेब फडणवीस सरकार असतानाही ते धावून जात होते. ते नेहमीच जातात, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेनबाबत जयंत पाटील म्हणाले की, जेवढी वाहतूक वाढेल त्याच्या १०-१५ दिवसांत कोरोना रुग्णसंख्याही वाढेल. राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवले. महिलांसाठी लोकलची सोय करावी ही राज्य सरकारची भूमिका आहे. रेल्वेने विनाकारण वेळ लावू नये, त्यांनी लवकर रेल्वे  प्रवास करू द्यावा.

ही बातमी पण वाचा : नुकसान लाखोंचं झालं, मात्र मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त ३ हजार ८०० रुपये; शेतकरी संतप्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER