मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अशी भाषा जनतेला सहन होणार नाही- जयंत पाटील

Jayant Patil criticises Kangana Ranaut

मुंबई : मी मुंबईत येत आहे. कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे खुले आव्हान देणारी अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut) काल केंद्राने दिलेल्या वाय प्लस सुरक्षेत मुंबईत पोहचली. त्यानंतर तिने थेट मुख्यमंत्र्यांवर वार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (CM Uddhav Thackeray) एकेरी भाषेत उल्लेख केला. यावरून राज्यातील अनेक नेते व मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असणारी संपूर्ण जनता संतापली आहे.

तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जर कोणी त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला असता, तर त्यांनीही हे चालवून घेतले नसते. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. “कशाला किती महत्त्व द्यायचे याला काही मर्यादा आहेत. एखाद्याने प्रसिद्धीसाठी विधानं केली तर प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष करावे. राज्यातील प्रमुखांबाबत अशी भाषा वापरणे हे जनतेला मान्य आणि सहन होणार नाही.” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच, विरोधी पक्ष भाजपने कंगनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या बाजूने बोलण्याची अपेक्षा आहे; मात्र भाजप नेते ती पूर्ण करत नाहीत. कोण कुणाला समर्थन देत आहे मुद्दामहून, हे महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. कंगनाचा बोलविता आणि करविता धनी कोण आहे, हे दिसत आहे.

तिच्यामागे कोणता पक्ष आहे, हे आता स्पष्ट झालं आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही कंगनाच्या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले असता आपल्याला याबद्दल कल्पना नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. हे तुम्ही सांगितल्यावर समजलं. माझ्या माहितीत असं आलेलं नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER