आगामी निवडणुकांसाठी कुठल्याही पक्षाने टोकाची भूमिका घेऊ नये, जयंत पाटलांचा सल्ला

Jayant Patil

मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने मुंबईपाठोपाठ आत नवी मुंबई महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गुरूवारी नवी मुंबईतील काँग्रेस भवनाचे उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीला धक्का दिला. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया देत आगामी निवडणूकांसाठी कुठल्याही पक्षाने फार टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता आज वाटत नसल्याचे म्हटले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, यावर आम्हाला भाष्य करायचं नाही. कारण निवडणूका लागणार नाहीत. निवडणुकीच्यावेळी जी परिस्थिती असेल त्याचे अवलोकन करून त्याबाबतीत बोलणं अधिक उचित ठरेल असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

तीन पक्ष आघाडी सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला आमचे दोन्ही मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेना यांना सर्व ठिकाणी सोबत घेऊन जाण्याची इच्छा आहे. पण एखाद्या जिल्हयात वेगळा विषय असेल तर संबंधित दोन्ही पक्षांशी चर्चा करुन त्यात योग्य तो निर्णय करु असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तिन्ही पक्ष एकाच भूमिकेत आहेत. कुणाचीही वेगवेगळी भूमिका नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यामध्ये दुमतही नाही. मराठा अर्सक्षणाबाबतची सर्व जबाबदारी ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते याबाबतीत कायदेशीर सल्ला घेणं, योग्य ती पावले टाकणे याविषयी मंत्रीमंडळातील सदस्यांशी सल्लामसलत करून अंतिमदृष्टया कार्यवाही करत असतात त्यामुळे मराठा आरक्षणावर आवश्यक व योग्य ते विधान अशोक चव्हाणच करतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा समाजाने आरक्षण मिळावे म्हणून मोठं आंदोलन केले. मात्र दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या विरोधात निर्णय दिला आहे. आता त्यातून मार्ग काढण्यासाठी दिल्ली दरबारातच आणि संसदेत यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी विचार केला पाहिजे व वेळ दिला पाहिजे असे मत जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button