संसदेतील विधानानंतर जया बच्चन ट्रोल; अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यांवरील सुरक्षा वाढवली

मुंबई : जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर   बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चारही बंगल्यांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संसदेत समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी बच्चन परिवाराला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

परिणामी ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जुहू स्थित बंगल्याबाहेरदेखील मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहेत. सीबीआयमार्फत या प्रकरणात अनेक नवे खुलासे रोज समोर येत आहेत.

सुशांतची मैत्रीण  रिया व तिचा भाऊ शौविक या केसमधील मुख्य आरोपी आहेत. त्यांना ड्रग्ज घेण्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तसेच, कंगना रणौतनेही इंडस्ट्रीत ड्रग्जचा व्यापार होत असल्याचे बोलल्यानंतर आता फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग्ज प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे. याचे पडसाद संसदेतदेखील उमटले आहेत.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासामध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता.

रवी किशन यांना उत्तर देताना संसदेत मंगळवारी जया बच्चन यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत हिने जया बच्चन यांना काही प्रश्न करत त्यांच्यावर टीका केली आहे. तर शिवसेनेने जया बच्चन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER