जावेद अख्तर यांच्याकडून कंगनावर अब्रू नुकसानीचा दावा, संजय राऊतांची माहिती

Javed Akhtar - Kangana Ranaut - Sanjay Raut

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा करत प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना रनौतविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी कंगना विरोधात अंधेरी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन (Hritik Roshan) याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना रनौतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी कंगनाने एका मुलाखतीदरम्यान जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन (Rakesh Roshan) आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.

कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले आहेत. अखेर याविरोधात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचललं आहे. जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER