जांभूळ – गोड तुरट रसाचे जम्बूफल आरोग्याला हितकर !

Java Plum Juice

नीलफला, श्यामला, महाफला, शुकप्रिया या पर्यायी नावाने आलेले जम्बू हे फल. उन्हाळा सरल्यावर पावसाळ्याच्या सुरवातीला बाजारात जांभळाचं दर्शन होऊ लागतं. निसर्गाची आपल्या आरोग्य रक्षणाकरीता किती किमया आहे बघा. उन्हाळ्यात पित्तशामक बलवर्धक फळांचा राजा आंबा आपल्याला चाखायला मिळतो. आंबा भरपूर खाल्लाय आता रक्तातील साखर वाढू शकते मग ते नैसर्गिकरित्या कमी करायचे तर जांभूळ फळ रुपात औषध तयार! मधुमेहींना वरदान म्हणजे जांभूळ हे आपल्याला माहिती आहेच. परंतु यापलिकडेही जांभळाचे अनेक फायदे आहेत.

जम्बू कषायमधुरा श्रमपित्तदाहकंठार्तिशोषशमनी क्रिमिदोषहन्त्री ।
श्वासातिसारकफकासविनाशिनी च विष्टम्भिनी भवति च रोचन पाचनी च ॥

  • जांभळाचं फळ हे तुरट अम्ल मधुर रसाचे असते. जांभळाचे फळ, साल, पत्र, बीज हे औषधी म्हणून वापरण्यात येते.
  • जांभळाची साल रक्तस्तंभन कार्य करणारी असल्यामुळे जखम, व्रण, रक्तस्त्राव होत असल्यास सालीचे चूर्ण लावतात.
  • बीयांचा गर वाटून केलेला लेप तारुण्यपिटिका म्हणजेच चेहऱ्यावरील मुरुमांवर लावल्यास लवकर बऱ्या होतात.
  • बीज चूर्ण तसेच सालीचा काढा थंड व तुरट असतो. अतिसार, आव पडणे, पोटशूळ यासारख्या विकारांवर हा काढा उत्तम कार्य करतो.
  • जांभळाची कोवळी पानांचा रस मध घालून दिल्यास वांती थांबते.
  • जांभळाचे बीजचूर्ण, मासिक पाळी जास्त जाणे, रक्तयुक्त आव पडणे यासारख्या विकारांमधे स्तंभन करण्याचे कार्य करते.
  • तोंडाला फोड येणे हिरड्यांमधून रक्त येणे यासारख्या मुखरोगात जांभळाच्या सालीचा काढा करून गुळण्या कराव्या.
  • मुखदुर्गंध मुखविकार नाहीसे होतात.

जांभळाचा सर्वात जास्त उपयोग प्रमेह, बहुमूत्रात होतो हे सर्वश्रुतच आहे. वारंवार मूत्र प्रवृत्ती होणे हे प्रमेहाचे लक्षण आहे. फळाचे बी मूत्रातील साखरेचे प्रमाण कमी करते म्हणूनच मधुमेह व्याधीत उपयोगी ठरते. अर्थात मधुमेह सारख्या विकारांत वैद्याचा सल्ला आवश्यक आहे. अति जांभूळ खाल्याने मलबद्धता होते व रुक्षता वाढू शकते.

असे हे जांभूळ फळ कमी दिवसच बाजारात दिसतात पण त्याचा आरोग्याकरीता नक्कीच फायदा करून घ्यावा.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button