जाऊबाई रंगल्या गप्पात

Dhanashree Kadgaonkar and Akshay Deodhar - Maharastra Today

मालिकेच्या निमित्ताने पडद्यावर तर एक कुटुंब साकारत असतं हे आपल्याला माहितीच आहे. पण मालिका संपल्यानंतरही त्यातील कलाकार जीवाभावाचे होत असतात. मालिकेच्या निमित्ताने जमलेली मैत्री कलाकारांच्या आयुष्याचा भाग बनते . आपण असे पाहतो की, पडद्यावर एकमेकांचे शत्रू असलेले कलाकार ऑफ स्क्रीन खूप छान मित्र असतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकमेकींशी न पटणार्‍या दोन जावा म्हणजेच नंदिता वहिनी आणि अंजली यांचेही अगदी असेच नाते होते. सीन असेल तेव्हा एकमेकींची खुन्नस काढणाऱ्या या दोघी जाऊबाई सेटवर मात्र धमाल करायच्या. त्याच आठवणींना उजाळा देत वर्षभराने या छोट्या पडद्यावरच्या जाऊबाई गप्पांमध्ये रंगून गेल्या . अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि अक्षया देवधर यांचा जीव गप्पांमध्ये रंगला . धनश्रीच्या बाळाला बघायला अक्षया तिच्या घरी गेली आणि मग या दोघींच्या गप्पांनाही उधाण आलं.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका साडेतीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. गेल्याच महिन्यात या मालिकेने निरोप घेतला. या मालिकेतील राणादा , अंजली पाठक बाई , नंदिता वहिनी, गोदाक्का, बरकत, सूरज यांच्यासह प्रत्येक भूमिका गाजली. मालिकेची नायिका अंजली हिचा जितका चाहता वर्ग होता तितकाच या मालिकेत अंजलीच्या आयुष्यात खो आणणारी खलनायिका नंदिताची भूमिका धनश्री काडगावकरने लोकप्रिय केली. अंजलीचा समंजसपणा या मालिकेत चाहत्यांना आवडलाच; पण नंदिताचा ठसकाही भाव खाऊन गेला. ही मालिका जरी गेल्या महिन्यात संपली असली तरी नंदिता ही भूमिका गेल्या वर्षीच ऑफ एअर गेल्यामुळे धनश्रीचा या मालिकेतील प्रवास थांबला होता. दरम्यान धनश्रीचे लग्न झाले आणि त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी धनश्री खऱ्या आयुष्यात आई झाली. हेच निमित्त साधून अक्षया धनश्रीच्या घरी गेली आणि त्यांनी बर्‍याच दिवसांनी गप्पा मारल्या. बाळासाठी खूप सार्‍या भेटवस्तू घेऊन अक्षयाने एक संपूर्ण दिवस धनश्रीसोबत घालवला. धनश्रीने या दोघींच्या भेटीचे आणि अक्षयाने बाळाला कुशीत घेतलेले फोटो सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत.

अक्षया सांगते की, ‘तुझ्यात जीव रंगला’ ही माझी पहिलीच मालिका; पण धनश्रीने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केल्याने तिला खूप अनुभव होता. जरी या मालिकेत पडद्यावर आमचं कधीच जमलं नसलं तरी ऑफ कॅमेरा आम्ही खूप धमाल करायचो. मालिकेचे शूटिंग कोल्हापूरजवळील वसगडे आणि केरली या गावात असल्यामुळे आम्ही सगळेच कलाकार कोल्हापुरात साडेतीन वर्षे राहिलो. घरापासून लांब असल्याने आमची चांगलीच गट्टी जमली. मालिका संपण्यापूर्वी धनश्रीचा रोल संपला तेव्हा ती आता सेटवर नसणार या विचाराने आम्ही दोघी खूप हिरमुसलो होतो; पण त्यानंतर धनश्रीचं लग्न आणि आता बाळ अशा छान गोष्टी तिच्या आयुष्यात आल्याने तिला कधी एकदा भेटते असं मला झालं होतं. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपल्यानंतर मला निवांत वेळ मिळाला आणि तेव्हाच मी धनश्री आणि तिच्या बाळाला भेटायचं ठरवलं.

धनश्री सांगते की, मालिकेत मी नेहमीच अक्षयाचा राग राग केला; पण ऑफ कॅमेरा माझी आणि तिची खूप छान मैत्री झाली. अक्षया माझ्या बाळाला भेटायला येणार हे मला कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला. एक तर मी मालिका सोडून वर्ष उलटलं होतं. त्यामुळे बऱ्याच दिवसांत मी तिला भेटले नव्हते. त्यामुळे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा अर्थातच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या अनेक आठवणी निघाल्या. गेल्या वर्षभरात प्रेग्नेंसीमुळे मी कुठेच बाहेर गेले नव्हते. त्यात कोरोना मुळेदेखील आपण सगळे घरात होतो आणि त्यामुळे जेव्हा अक्षया आणि मी दोघी जणी भेटलो तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER