बूम बूम बुमरा…मायदेशात खेळतोय पहिलाच कसोटी सामना

जसप्रीत बुमरा (Jaspreet Bumrah)…भारताचा हुकूमी गोलंदाज. चांगले 17 कसोटी सामने खेळलाय पण त्यापैकी एकही भारतात नव्हता. 3 वर्षांपूर्वी तो पहिला कसोटी सामना खेळला होता दक्षिण आफ्रिकेविरुध्द केपटाऊनच्या मैदानावर. तेंव्हापासून तो दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंड, आॕस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज व न्यूझीलंडमध्ये खेळला पण मायदेशात एकही सामना नव्हता. आता 17 सामने व 34 डावानंतर तो भारतात पहिला कसोटी सामना खेळतोय.चेन्नईच्या (Chennai) चिदंबरम स्टेडियमवर तो मायदेशातील पदार्पण करतोय.

याप्रकारे पदार्पणापासून परदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळायच्या वेस्ट इंडिजच्या डॕरेन गंगाच्या (Darren Ganga) विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. डॕरेन गंगानेही डिसेंबर 1998 ते एप्रिल 2003 दरम्यान आपले पहिले सलग 17 सामने परदेशातच खेळले होते. त्याच्याआधी इंग्लंडचे बर्ट स्ट्रडवीक आणि बिली गेटस् यांनी आपले पहिले 15 सामने परदेशात खेळले होते. इंग्लंडच्याच फ्रेडरिक फेन यांनी आपले पहिले सलग 14 सामने परदेशात खेळले होते.

भारतीय खेळाडूंचा विचार केला तर जसप्रीत बुमराच्या आधी जवगल श्रीनाथने पदार्पणापासून 12 कसोटी सामने परदेशात खेळले होते. आर.पी.सिंगचे पहिले 11 सामने तर सचिन तेंडूलकर व आशीष नेहरा यांचे पहिले 10 सामने परदेशात होते.

यामध्ये याची नोंद घ्यायला हवी की पाकिस्तानात 2009 ते 2018 दरम्यान कसोटी सामने खेळले गेले नसले तरी युएईमध्ये (शारजा, अबुधाबी, दुबई) येथे जे कसोटी सामने खेळले गेले ते पाकिस्तानच्या घरच्याच मैदानांवरील सामने मानले जातात. यामुळे पाकिस्तानी खेळाडू या पंक्तीत बसत नाहीत.

जसप्रीत बुमराच्या नावावर आतापर्यंत 79 विकेट आहेत आणि मायदेशी पदार्पण करण्याआधीचा सर्वाधिक विकेटचा हा विक्रम आहे. त्याच्याआधी वेस्ट इंडिजच्या आल्फ व्हॕलेंटाईन यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी आपल्या पहिल्या 65 विकेट परदेशातच काढल्या होता.

बुम बुम बुमराने आपल्या कसोटी पदार्पणात 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द 1 व 3 बळी मिळवले होते. आता मायदेशातील पदार्पणात त्याची कामगिरी कशी होते ते कळेलच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER