जपानने केले स्पष्ट, टोकियो ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणेच होणार!

japan

जगभरात कोरोनाची (Corona) पुन्हा लाट दिसून येत असली तरी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) हे ठरल्याप्रमाणेच यंदा जुलै व ऑगस्टमध्ये होतील असे जपानने स्पष्ट केले आहे. कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर हे ऑलिम्पिक यंदा होणार नसल्याची आणि आता हे सामने रद्दच करून टोकियोला २०३२ च्या सामन्यांचे यजमानपद दिले जाणार असल्याची चर्चा जोरात आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानकडून हे स्पष्टीकरण आले आहे.

जपानमध्येही कोरोनाचा नव्याने प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. हे ऑलिम्पिक सामने कोरोनामुळे आधीच एक वर्ष पुढे ढकलण्यात आले आहेत. हे सामने यंदाच आयोजित करण्यास आपण कटिबद्ध असल्याचा जपानने पुनरुच्चार केला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे जपानमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे; पण टोकियो ऑलिम्पिकचे ठरल्याप्रमाणे २३ जुलै रोजी उद्घाटन होणार असल्याबद्दल आयोजक ठाम आहेत. तेथील सरकारी प्रवक्त्याने म्हटले की, जपानने आता २०३२ मध्ये ऑलिम्पिक आयोजनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.  या आशयाच्या ‘दी टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.

ऑस्ट्रेलिया व अमेरिकन ऑलिम्पिक समित्यांनीसुद्धा  त्यांची ऑलिम्पिकची तयारी ठरल्यानुसार सुरू असल्याचे म्हटले आहे. जपानला कोरोनाचा इतर ठिकाणच्या तुलनेत कमीच प्रादुर्भाव जाणवला आहे. पण अलीकडे  रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांनी परदेशी लोकांना प्रवेश बंद केला आहे आणि टोकियोसह काही प्रमुख शहरांत आणीबाणी जाहीर केली आहे. अलीकडेच घेतलेल्या जनमत चाचण्यांमध्ये ऑलिम्पिक सामने यंदा जपानमध्ये होऊ नयेत असे ८० टक्के लोकांचे मत दिसून आले आहे. मात्र जपानचे राष्ट्राध्यक्ष योशीहिदे सुगा व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थाॕमस बाक यांनी हे सामने यंदाच होतील असे म्हटले आहे. त्याबद्दल शंका वाटण्याचे काही कारणच नसल्याचे बाक यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER