जन्मशताब्दी स्वरभास्कराची…

Pandit Bhimsen Joshi

Shailendra Paranjapeपंडित भीमसेन जोशी, मैफलीचा बादशाह-सम्राट. मराठी आणि कानडी या भाषाभगिनी आणि मूळ कानडी असलेले भीमसेन जोशी विविध शहरात ज्ञानग्रहण करून पुण्यात स्थायिक व्हावेत आणि पुण्यातच त्यांना भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, हा पंडितजींसाठी नव्हे तर पुण्यासाठीही भाग्ययोगच म्हणायला हवा. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झालेला आहे आणि त्यांचे चाहते, कुटुंबीय तसेच आर्य संगीत प्रसारक मंडळ यांनी पंडितजींचं जन्मशताब्दीवर्ष साजरं करायचं ठरवलंय. त्याबरोबरच यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव न भूतो न भविष्यति, असा करायचा आहे, अशी मंडळाची इच्छा आहे.

पंडितजींच्या गायकीबद्दल त्यांनी गाजवलेल्या मैफलींबद्दल, ड्रायव्हिंगच्या पँशनबद्दल आणि एकूणच त्यांच्याबद्दल राष्ट्रीय बातम्यांपासून ते स्थानिक वाहिन्या, वृत्तपत्रं यातून विविध स्वरूपाची माहिती समोर आणली जातीय. रेडिओ या प्रभावी माध्यमातून तर त्यांची जुनी ध्वनिमुद्रणं ऐकवली जाताहेत, त्यांच्या जुन्या मुलाखतीही ऐकायला मिळताहेत. त्यातून नव्या पिढीला भारत रत्न झालेले भीमसेन जोशी हे काय रसायन होतं, याची झलक बघायला, ऐकायला जाणून घ्यायला मिळेल.

समाज हा प्रवाही पद्धतीने विकसित होत जात असतो, प्रगल्भतेकडे वाटचाल करत असतो. जीवनाच्या विविध क्षेत्रात समाजपुरुष प्रगतीसह वाटचाल करताना या सर्व क्षेत्रातले नामवंत लोक त्यात आपापल्या परीने भर घालत असतात. पन्नास वर्षांपूर्वीच्या पिढीला बालगंधर्व हे सुरेल स्वप्न प्रत्यक्षात बघायला मिळालं होतं. आमची पिढी बालगंधर्वांना प्रत्यक्ष बघू शकली नाही पण आम्ही अभिमानानं सांगू शकतो की आम्ही एकाच जन्मात तीन तीन भारतरत्न बघू शकलो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, बँटने तळपणारा क्रिकेटसूर्य सचिन तेंडूलकर आणि स्वराधिराज भीमसेन जोशी.

आपल्या संस्कृतीत नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. धार्मिक कथांमधून बोधकथांमधून स्मरणरूपी भेटीचंही महत्त्व काही ठिकाणी अधोरेखित झालेलं दिसतं. त्यामुळे भीमसेन जोशी यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होत असताना आपल्या संकेतस्थळाच्या वाचकांनाही पंडितजींची स्मरणरूपी भेट घडवावी, इतकाच माफक उद्देश या लिखाणातला आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे संगीत, त्यातही शास्त्रीय संगीत या विषयातलं ज्ञान तर नाहीच पण कानसेन होण्याचा प्रयत्न कायम करत आलोय. तरीही लिहिण्याचं महत्त्वाचं कारण असं की या स्वरभास्कराला प्रत्यक्ष भेटण्याचा योग पत्रकारितेमुळे अनेकदा आला.

पुण्यामधे दैनिकांमधे नोकरी करताना दर वर्षी ४ फेब्रुवारीचा शिरस्ताच असायचा. साहित्य-सांस्कृतिक असे विषय कव्हर करणारे सगळेच पत्रकार वेळ ठरवून पंडितजींच्या घरी पोहोचायचे. मग त्यांच्या पाया पडायचे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन वाढदिवसानिमित्त त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत बातमीरूपाने आपापल्या वृत्तपत्रासाठी लिहायचे, असे अनेक वर्षे करायला मिळाले. त्या सर्व औपचारिक भेटींमधेही मुलाखत मनोगतानंतर पंडितजी खरे खुलायचे. त्यांची त्यांच्या संगीताइतकीच शार्प विनोदबुद्धी प्रत्ययाला यायची. त्यांच्या कॉमेन्ट्स खूपच तीव्र असायच्या आणि वागण्याची पद्धत कोमल.

आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून देशविदेशात नाव कमावणारे अनेक कलावंत आहेत, क्रिकेटवीर आहेत, अभिनेते आहेत. पण भाषा-धर्म-पंथ या सर्वांच्या पलीकडे जाऊन सर्वांना जोडतं ते संगीत. अभिजात संगीत क्षेत्रात स्वरभास्कर अशी उपाधी सार्थपणे मिळवणारे पंडितजी सर्वार्थाने भारतरत्न आहेत.

संतवाणी असो की सखी मंद झाल्या तारका, जुन्या मराठी चित्रपटातली फारशी प्रसिद्ध नसलेली गाणी असोत की रम्य ही स्वर्गाहुनि लंका, सारखे गाजलेले चित्रपटातले गाणे, हिन्दी चित्रपटात केवळ क्लासिकल गाणीच नव्हे तर अनकही सारख्या चित्रपटात त्यांनी गायलेली रघुवर तुमको मेरी लाज आणि झिमिक झिमिक झिमी हे गाणे असो, पंडितजींनी कोट्यवधी रसिकांना, सामान्यजनांना दिलेला आनंद अक्षय असाच आहे. त्यामुळे माणूस आहे तोवर चंद्रसूर्य राहतील आणि तोवर स्वरभास्कराचा आवाज आपलं सर्वांचं जगणं समृद्ध करत राहील. त्यांच्या स्मृतींना आदरांजली.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER