जान्हवीने करावा श्रीदेवीचा रोल, सरोज खानच्या मुलीची इच्छा

Janhvi Kapoor - Remo D'Souza - Saroj Khan

बॉलिवुडच्या (Bollywood) प्रख्यात डांस डायरेक्टर सरोज खान (Saroj Khan) यांनी अनेक नायिकांना आकर्षक स्टेप्स देऊन त्यांचे डांस प्रचंड लोकप्रिय केले. बॉलिवुडमधील असा एकही कलाकार नाही ज्याला सरोज खान यांनी नाचवलेले नाही. याच सरोज खान यांच्या जीवनावर डांस डायरेक्टर आणि डायरेक्टर रेमो डिसूझा (Remo D’Souza) सिनेमा बनवणार आहे. या सिनेमात सरोज खान यांनी नाचवलेल्या नायिकांची कथाही दाखवण्यात येणार आहे. सरोज खान यांच्यामुळे श्रीदेवी (Sridevi) आणि माधुरी यांचे डांस कमालीचे लोकप्रिय झाले होते. या सिनेमात श्रीदेवीची भूमिका तिची मुलगी जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) साकारावी अशी इच्छा सरोज खानच्या मुलीने व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरोज खानच्या जीवनावर तयार होत असलेल्या या सिनेमात सरोज खान यांची भूमिका माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) साकारणार आहे. सरोज खान यांचे माधुरीवर विशेष प्रेम होते आणि माधुरीला सरोज खान यांच्या सर्व स्टेप्स चांगल्या ठाऊक आहेत. सरोज खानची मुलगी सुकैनाने सांगितले, सिनेमात माधुरी नसती तर मी खूप निराश झाले असते. कारण माधुरीच माझ्या आईची भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकते. श्रीदेवी नसल्याने तिची भूमिका कोण करेल असा प्रश्न आमच्यासमोर आहे, परंतु मला वाटते की जान्हवीने श्रीदेवीची भूमिका साकारावी. जान्हवी दिसतेही श्रीदेवीसारखीच आणि ती चांगली डांसरही आहे. कथेत तीन चार अभिनेत्री असतील ज्या वेगवेगळ्या वयातील असतील आणि त्यांचा प्रवास सरोज खानसोबत कसा झाला ते दाखवले जाईल. माझ्या आईने केवळ माधुरी, श्रीदेवीच नव्हे तर आताच्या पिढीतील अनन्या पांडे, सारा अली खान आणि तारा सुतारियाबरोबरही काम केले आहे.

रेमोने सरोज खान यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी तो अजून स्क्रिप्ट घेऊन सुकैनाकडे गेलेला नाही. सुकैना म्हणते, ‘सिनेमाला सुरुवात करण्यापूर्वी त्याने माझी परवानगी घेणे आवश्यक आहे. कारण हा माझ्या आईचा बायोपिक आहे. तो स्क्रिप्ट घेऊन आला की मी लगेचच त्याला परवानगी देईन. कारण माझ्या आईची जीवनगाथा पडद्यावर लवकरात लवकर येवो असे मलाही वाटते असेही सुकैना म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER