‘जंगजौहर’ आता झाला ‘पावनखिंड’

Pavankhind

पावनखिंड (Pavankhind) नाव घेताच डोळ्यांसमोर बाजी प्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande) येतात आणि त्यांची ती पावनखिंडीतील लढाई, शिवाजी महाराज सुखरूप विशालगडावर पोहचल्यानंतर त्यांनी सोडलेले प्राण हे आठवून आजही अंगावर रोमांच उभे राहातात. बाजीप्रभू देशपांडे यांच्या या शौर्यगाथेवर २०१९ मध्ये ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ सिनेमाचे दिग्दर्शन करणाऱ्या अभिजित देशपांडे यांनी पावनखिंड सिनेमाची घोषणा केली होती. गेल्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार होता. पण झाला नाही.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या या पावनखिंडीच्या शौर्यगाथेवर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘जंगजौहर’ (Jangjauhar) सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा आता तयार झाला असून या वर्षी प्रदर्शित होणार आहे. पण आता या सिनेमाचे नाव बदलण्यात आले असून ‘पावनखिंड’ असे ठेवण्यात आलेले आहे. बदललेल्या नावाची नुकतीच घोषणा करण्यात आली आणि पोस्टरही रिलीज करण्यात आले. शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यात असताना २ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. सिद्दी जोहर वेढा सोडण्यास तयार नव्हता. तेव्हा शिवाजी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप पाठवला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला आणि शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्धी जोहरकडे जाऊन तहाची बोलणी सुरू केली. त्याला बोलण्यात गुंतवले असताना छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याहून निसटले आणि विशालगडाकडे निघाले.

मात्र सिद्धी जोहरला ही गोष्ट कळली. त्याने शिवा काशीदचे खरे रूप समजल्याने त्याला ठार केले आणि सिद्धी मसूदला शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवले. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले. तेव्हा बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशालगडावर पोहचून तोफांनी इशारा करत नाहीत तोवर खिंड लढवेन असे सांगितले आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. घोडखिंड अत्यंत चिंचोळी असल्याने मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल केली. लढाईत असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यांनी सिद्धी मसूदला खिंडीत अडकवले आणि शिवाजी महाराज तोपर्यंत विशालगडावर सुखरूप पोहचले. या लढाईत शिवाजी महाराजांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास तीन हजार सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमामुळेच घोडखिंडीलाच नंतर ‘पावनखिंड’ असे नाव देण्यात आले. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकरने याच कथानकावर आधारित ‘जंग जौहर’ची निर्मिती केली. मुहूर्तापासून कायम चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरुद्ध यांनी केली आहे. ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांना मिळालेले यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पालने ‘शिवराज अष्टका’तील तिसरे पुष्प या सिनेमाच्या माध्यमातून शिवचरणी अर्पण करण्याचे ठरवले होते.

मात्र आता सिनेमाचे ‘जंग जौहर’ हे नाव बदलून ‘पावनखिंड’ करण्यात आले असून हा सिनेमा १० जून रोजी रिलीज केला जाणार आहे. ज्या निर्मात्यांच्या नावावर पावनखिंड हे शीर्षक होते त्यांनी ‘जंग जौहर’ला ‘पावनखिंड’ शीर्षक वापरण्याची परवानगी दिल्याने नाव बदलण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER