४५ दिवसांत अडीच हजार कोटी जनधन खात्यात जमा

Old Notes
File Image

बीड : नोटाबंदीच्या निर्णयानंतर रकमेचा प्रश्न जनसामान्यांना पडला असले तरी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेतलेला निर्णय सर्वसामान्यांना मान्य असल्याचे जाणवत आहे. हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्यानंतर अनेकांनी जमा केलेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असून ४५ दिवसांत तब्बल अडीच हजार कोटींच्या ‘जनधन’ ची आवक-जावक झाली आहे. नोटाबंदीवर चलनविरहित व्यवहाराची माहिती लोकांना मिळाली असून पेट्रोल पंप, शहर वाहतूक शाखा, मोठय़ा दुकानांमध्ये स्वाईप मशीनद्वारे व्यवहार होऊ लागले आहेत. किरकोळ व्यावसायिकांकडूनही चलनविरहित व्यवहाराला प्रतिसाद मिळत आहे.

बीड जिल्ह्यात नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी बँकांबाहेर भल्या पहाटेपासून लागणाऱ्या रांगा अनेकांना कष्टदायी वाटल्या. हजार, पाचशेच्या नोटा घरांमध्ये साठवून ठेवून अनेक मोठय़ा व्यवहारांची स्वप्न पाहणाऱ्यांना घरातील जमा असलेल्या नोटा बाहेर काढाव्या लागल्या. १८ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये नोटा जमा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, आजही ती कायम असून ४५ दिवसांत तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा बँकांमध्ये भरणा करण्यात आला.

स्वत:जवळील जुन्या नोटा भरण्यासाठी जनधन योजनेच्या खात्याचाही वापर सुरुवातीला झाला. जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल ४ लाख २६ हजार ४९० जनधन योजनेचे खाते उघडण्यात आले असून त्यामध्येही लाखो रुपयांचा भरणा झाला आहे. नोटा बंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांचे हाल झाले असले तरी याच लोकांनी घरामध्ये साठवून ठेवलेला पसा बाहेर काढत तब्बल अडीच हजार कोटींच्या धनाची उलाढाल केली आहे.