आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

Adityaa Thackeray

जळगाव : शिवसेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ आजपासून जळगाव जिह्यातून होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे जळगाव जिल्हा व खान्देशात शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जळगाव ग्रामीण-धरणगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा व अंमळनेर या पाच विधानसभा क्षेत्रांत जन आशीर्वाद यात्रा जाणार असून आदित्य ठाकरे हे संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानायचे आहेत. ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मने जिंकायची आहेत, असा विश्वास व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.

मुंबई येथून विमानाने आदित्य ठाकरे यांचे जळगावात आगमन होणार आहे. त्यानंतर जळगावच्या किसनजीनगरातील प्रसिद्ध गणपती मंदिरात आदित्य ठाकरे हे पूजा करून मार्गस्थ होणार आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिरसोली येथे वृक्षारोपण व स्वागत झाल्यावर पाचोरा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, लक्ष्मीनगर या ठिकाणी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या दौऱ्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, संपर्कप्रमुख विलास पारकर व संजय सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक करत आहेत.