
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जन आशीर्वाद यात्रा काढली अशी चर्चा आहे . मात्र शिवसेनेने राज्यात काढलेली यात्रा ही मतांसाठी नसून मतदारांचे आभार मानण्यासाठी आहे. शिवसेनेच्या विरोधात काम करणाऱ्या मतदारांचे मन वळवून त्यांना शिवसेनेचे प्रेम कसे असते हे दाखवायचे आहे. त्यामुळे जन आशीर्वाद यात्रा माझ्यासाठी ‘तीर्थयात्रा’ आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले .
तसेच कर्जमुक्त शेतकरी, प्रदूषणमुक्त व भगवा महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा,’ असे आवाहनही त्यांनी केले . ते वैजापूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
मागील पाच वर्ष सत्तेत असतांनाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेला प्रयत्न करावे लागले. आम्हाला कर्जमाफी नको आहे, कारण माफी गुन्हेगाराला दिली जाते. शेतकरी हा गुन्हेगार नाही. त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, अशी मागणीही आदित्य यांनी केली . तसेच येत्या निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी मी पुन्हा वैजापूरला येईन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्यात निर्माण होणारी आर्थिक मंदी व दुष्काळाचा सामना सर्वांनी एकत्र येऊन करायचा आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांचा पीक विम्याचा लाभ मिळाला, अशी ,माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली .