जम्मू काश्मीर DDC निकाल : ‘गुपकार’ आघाडीवर पण भाजप सर्वात मोठा पक्ष

J&K DDC elections

मुंबई : जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) जिल्हा विकास परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल काल जाहीर करण्यात आला . या निकालात सात पक्षांच्या ‘गुपकार’ (Gupkar) गटाने बाजी मारलेली दिसत असली तरी भाजप मात्र या केंद्रशासित प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला.

जिल्हा विकास परिषद निवडणुकीत भाजपविरुद्ध (BJP) सात दलांनी एकत्र येत ‘गुपकार’ आघाडी स्थापन केलीय. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, सीपीआय, सीपीएम या पक्षांचा समावेश आहे.

ही बातमी पण वाचा:- काश्मीरमध्ये फुलले कमळ; डीडीसी निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष

या निवडणुकीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं पहिल्यांदाच आपलं खातं उघडलंय. उल्लेखनीय म्हणजे, जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर ही केंद्रशासित प्रदेशातील पहिलीच निवडणूक होती. आठ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद निवडणुकीची सुरुवात २८ नोव्हेंबर रोजी झाली होती. या दरम्यान २८० जागांवर निवडणुका पार पडल्या. २८० पैंकी १४० जागा जम्मू विभागात तर १४० जागा काश्मीर विभागात येतात.

या निवडणुकीत जम्मू विभागात भाजपनं मुसंडी मारलेली दिसतेय. इथे पक्ष आपला जिल्हा विकास परिषद अध्यक्ष बनवणार आहे. जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर, डोडा आणि रेसाई या जिल्ह्यांत पक्षाला बहुमत मिळालंय.

काश्मीर विभागात मात्र भाजपला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुस्लीमबहुल काश्मीर खोऱ्यातील खोनमोह, बांदीपोरा आणि काकपोरा या भागांत भाजपला मतं मिळाली आहेत.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ ए संपुष्टात आणण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या भाजपची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER