
श्रीनगर : पाकिस्तान आपल्या कुरापती करण्यापासून बाज येताना दिसत नाही. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. तर आज जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पूंछमधील एक महिला ठार झाली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवले गेल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कालच झाला दहशतवादी हल्ला
भारतीय गुप्तचर यंत्रणेने बालाकोट संदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतर, काल काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांनी एका ट्रकवर हल्ला केला होता. यामध्ये राजस्थानचा रहिवासी असलेला ट्रकचालक जागीच ठार झाला होता. यानंतर दहशतवाद्यांनी ट्रक पेटवून दिला होता. या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी असल्याची माहिती काल समोर आली होती.
११ तारखेलाच झाला होता एक जवान शहीद
११ ऑक्टोबरला नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला होता, यामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला होता. तर, १३ ऑक्टोबरला बारामुल्ला आणि उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता, यामध्ये एक जवान जखमी झाला होता.
या घटनेच्या जखमा भरून निघत नाही तोच आज पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामुळे भारतीयांत संतापाची लाट आहे.