बॉलिवूडमध्ये जुळ्यांचा जलवा

Sanjay Dutt - Karan Johar

धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची लहान मुलगी अहानाने शुक्रवारी जुळ्या मुलींना जन्म दिला. 2014 मध्ये अहानाने उद्योगपती वैभव वोहरासोबत लग्न केले होते. त्यांना अगोदरच एक मुलगाही आहे. अहानाने जुळ्या मुलींना जन्म दिल्याने हेमा आणि धर्मेंद्रला आनंद झाला असून वोहरा कुटुंबियांमध्येही आनंद साजरा केला जात आहे. हिंदुजा हॉस्पिटलने एक पत्रक काढून अहानाला जुळ्या मुली झाल्याची माहिती दिली होती. कदाचित ही बातमी तुम्ही वाचेपर्यंत अहाना हॉस्पिटलमधून मुलींना घेऊन घरीही गेली असेल. वोहरा कुटुंबाने या दोन्ही मुलींची नावेही ठेवली आहेत.

अहानापूर्वी बॉलिवू़डमध्ये अन्य अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. बॉलिवूडमधल्या जुळ्या मुलांच्या आईबापांवर यानिमित्ताने एक नजर-

खामोश म्हणत समोरच्याला गप्प बसायला लावणारा यशस्वी अभिनेता आणि अयशस्वी राजकारणी शत्रुघ्न सिन्हाही जुळ्या मुलांचा पिता आहे. शत्रुघ्न सिन्हाने अभिनेत्री पूनमशी 1980 मध्ये लग्न केले आणि 1983 मध्ये त्याच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला. जुळे असल्याने या दोन्ही मुलांची नावे लव आणि कुश ठेवण्यात आली. लवने ‘सदियां’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होेते परंतु तो काही यशस्वी होऊ शकला नाही. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत लवने काँग्रेसकडून निवडणुक लढवली होती परंतु त्याला हार पत्करावी लागली. कुशही आता लवकरच राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांच्या जन्मापूर्वी पूनम सिन्हा यांनी सोनाक्षीला जन्म दिला होता. सोनाक्षी सध्या बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून काम करीत आहे.

कॅन्सरच्या आजारातून नुकताच बरा झालेला अभिनेता संजय दत्तही जुळ्या मुलांचा बाप आहे. संजय दत्तने आतापर्यंत तीन लग्ने केली आहेत. 1987 मध्ये त्याने अभिनेत्री मॉडेल रिचा शर्माबरोबर लग्न केले होते. परंतु ब्रेन ट्यूमरमुळे रिचाचा 1996 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर संजय दत्तने प्रख्यात मॉडेल रिया पिल्लईसोबत लग्न केले. परंतु हे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि या दोघांनी 2005 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर 2008 मध्ये संजय दत्तने चित्रपटात छोट्या मोट्या भूमिका करणाऱ्या मान्यतासोबत लग्न करून सगळ्यांनाच चकित केले होते. लग्नानंतर मान्यताने 2010 मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मुलाचे नाव शाहरान आणि मुलीचे नाव इकरा ठेवण्यात आले आहे. संजय दत्तला रिचा शर्मापासून झालेली त्रिशाला नावाची एक मुलगी असून ती परदेशातच असते.

बॉलिवूडमध्ये करण जोहरने एक यशस्वी निर्माता, दिग्दर्शक, होस्ट म्हणून नाव कमवले आहे. वडिलांच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनीला त्याने एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. करण जोहरने लग्न केले नाही परंतु सरोगसीच्या माध्यमातून त्याने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला आहे. 2016 मध्ये करणने ही दोन्ही मुले घरी आणली होती. या दोन्ही मुलांची नावे त्याने वडिल यश आणि आई हिरू यांचीच नावे दिली आहेत.

बॉलिवूडमध्ये विनोदी अभिनेता म्हणून कृष्णा अभिषेकने चांगलेच नाव कमवले आहे. मात्र चित्रपटांपेक्षा तो छोट्या पडद्यावर जास्त लोकप्रिय आहे. कृष्णाने अभिनेत्री काश्मिरा शाहशी लव मॅरेज केले होते. मे 2017 मध्ये कश्मिराने जुळ्यांना जन्म दिला होता. विशेष म्हणजे या दोघांनीही सरोगसीच्या माध्यमातून जुळ्यांना जन्म दिला होता. मुलांच्या जन्मानंतर कृष्णा आणि कश्मिरा प्रचंड आनंद झाले होते. याचे कारणही तसेच आहे.

कश्मिराने आई झाल्यानंतर याबाबत बोलताना सांगितले होते, लग्नानंतर मुलांना जन्म देण्यासाठी मी चित्रपटांमध्ये काम करणे सोडले होते. परंतु अनेकदा प्रयत्न करूनही काही ना काही कारणाने आई बनण्यात मी अयशस्वी होत होती. जेव्हा नैसर्गिकरित्या मी आई होत नाही असे पाहिले तेव्हा मी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरवले आणि त्यानंतर मी जुळ्या मुलांना जन्म दिला. तुम्हाला कदाचित खोटे वाटेल पण जवळ जवळ 14 वेळा मी आई बनण्यात अयशस्वी झाले होते. त्यानंतर माझे वजनही खूप वाढले होते. परंतु मी हार मानली नाही. लोकांनी माझ्यावर तेव्हा खूप टीका केली होती पण मी त्याकडे दुर्लक्ष केले असेही कश्मिराने सांगितले होते.

बिग बॉसमधील स्पर्धक आणि अभिनेता कर्णवीर बोहराही जुळ्या मुलींचा पिता आहे. कर्णवीरने अभिनेत्री टीजे सिद्धूशी लग्न केले आहे. 19 ऑक्टोबर 2016 ला टीजेने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. टीजे सिद्धू आता पुन्हा एकदा गरोदर आहे.

प्रख्यात अभिनेत्री सेलिना जेटलीनेही जुळ्या मुलांना जन्म दिला होता. परंतु दुर्देवाने तिचा एक मुलगा जन्मानंतर काही तासातच हे जग सोडून गेला होता. सेलिना हे दुःख अजूनही विसरू शकलेली नाही.

छोट्या पडद्यावरील हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान, किंशुक महाजन आणि दिव्या गुप्ता या जोडप्यांनीही जुळ्यांना जन्म दिलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER