भाजपच्या मोठ्या नेत्याची लवकरच राष्ट्रवादीत घरवापसी? पवारही इच्छुक

Jalindar Kamthe

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे (Jalindar Kamthe) हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झाले होते. मात्र, पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालांच्या पार्श्वभूमीवर हा नेता घरवापसी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या पुरंदर तालुकाध्यक्षांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात वर्षानुवर्षे    राष्ट्रवादीचे काम करणारे अनेक नेते आमदारकीसाठी इच्छुक होते.

अशात माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांचीही स्पर्धेत एंट्री झाली होती. मात्र, पुरंदर तालुका जागावाटपात काँग्रेसकडे गेला आणि सगळ्यांच्या अपेक्षा म्यान झाल्या. जालिंदर कामठेंनी मात्र २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप प्रवेश केला होता. भाजपत जाताना मात्र त्यांनी ‘जिल्ह्यातील काही चांडाळ चौकडीला कंटाळून भाजपत जात आहे’ असे स्पष्ट केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकांचा कामठेंसह सगळ्यांचाच अंदाज चुकला आणि शरद पवार यांच्या प्रभावामुळे कुणाच्या कल्पनेतही नसलेले महाआघाडी सरकार स्थापन झाले. आणि भाजपत गेलेल्यांवर नाराजीची वेळ आली. ‘आयात’ नेतेमंडळींना भाजपकडूनही फारसे बळ मिळताना दिसत नाही.

त्यामुळे पुन्हा घरवापसीला ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अनेकांची घरवापसी होणार असे सूचित केले आहे.सध्या पुरंदर तालुक्यात माजी आमदार अशोक टेकवडेंसारखे काही अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या बड्या नेतेमंडळींचा गावातच पराभव झाला आहे. बदललेल्या सत्ता समीकरणांचा पक्षाला फटका बसत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर कांचन निगडे या राष्ट्रवादीच्या माजी युवक उपाध्यक्षांनी ‘भाऊ परत या’ अशी साद कामठे यांना थेट समाजमाध्यमातून घातली होती.

त्याला प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही पुरंदरमधील पक्षाच्या परिस्थितीबद्दलचे पत्र लिहिले. संवेदनशील वातावरणातच या बाबी ‘व्हायरल’ झाल्या आहेत. कामठे यांनाही राष्ट्रवादीतून अनेक फोन गेले. यामुळे कामठे यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या पुरंदर तालुकाध्यक्षांनीही यास दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER