एकनाथ खडसेंच्या फार्म्युल्यानेच जळगावमधील भाजपची सत्ता शिवसेनेच्या हातात

जळगाव :- आज जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौरपदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) भाजपच्या (BJP) हातातील सत्ता आपल्याकडे खेचली आहे. सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं जळगाव महापालिकेवर भगवा फडकावला आहे. हा भाजपसोबतच जळगावमध्ये ज्यांचं प्रस्थ मानलं जातं, ते भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जबर धक्का मानला जात आहे. त्याच वेळी काही महिन्यांपूर्वीच “बदल करून दाखवेन” असा दावा व्यासपीठावर करत भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा तो मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेत हा विजय कसा जुळवून आणला याचा फॉर्म्युलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितला आहे. केवळ १० दिवसांत फासे फिरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेनं महापालिकेवर झेंडा फडकावल्यानंतर खडसे यांनी सांगितलं की, भाजपची एकहाती सत्ता असूनदेखील जळगावात भाजपला पराभवाची धूळ चारण्याचा सगळा प्लॅन गेल्या १० दिवसांत जुळून आला. जळगावात भाजपची एकहाती सत्ता होती. पण कामं होत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनतादेखील नाराज होती. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावाच लागला नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) झालेल्या चर्चेविषयीदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं. १० दिवसांपूर्वी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक येऊ शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते, असं खडसेंनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER