जलौकावचरण – दूषित रक्त निर्हरणार्थ एक आयुर्वेदिक चिकित्सा !

जलौका जळवा हा शब्द अनेकांनी ऐकला असेल. दूषित रक्त निर्हरण करण्याकरीता जळवा आयुर्वेद तज्ज्ञ वापरतात. रक्तमोक्षण या पंचकर्मा करीता जलौका वापरण्यात येतात. जल हेच यांचे आयुष्य, पोषण, आहार असतो म्हणून यांना जलौका म्हणतात. पाण्यात, चिखलामधे सहसा जळवा सापडतात. चिकित्साकरीता उपयुक्त जळवा छोट्या छोट्या डबक्यात पण असतात. जळवांच्या अनेक जाती आयुर्वेदात सांगितल्या आहेत. चिकित्सेत प्रामुख्याने निर्विष जलौका वापरण्यात येतात. जलौका किंवा जळवा या अशुद्ध रक्त शोषण करतात. आयुर्वेदात अनेक व्याधींमधे जळवा वापरण्यात येतात. मूळव्याध, विद्रधी ( मोठे फोड), नागीण, कुष्ठ, त्वचाविकार, गलगण्ड, विष विकार अशा विविध व्याधी मधे जलौका लावल्याने लगेच आराम पडतो.

आजकाल व्हेरिकोज व्हेनचा त्रास खूप वाढलेला आहे. पायाच्या शिरा ताठरल्याने पाय दुखणे, पायावर सूज येणे अशा तक्रारी दिसून येतात. यावर जलौका लावल्यास खूप फायदा होतो.

शिरोरोगात जलौका लावल्याने उपशय मिळतो.

केसांच्या तक्रारी चाई पडणे, अॅलोपेशिया या व्याधीवर जलौका लावल्यास पुन्हा केस येण्यास मदत होते.

तरुणावस्थेत बऱ्याच मुला मुलींना पुरळं येणे पिंपल्स येणे अशा तक्रारी निर्माण होतात. बरेच लेप पॅक औषध घेऊनही त्वचा स्वच्छ होत नाही या अवस्थेत जळवा लावून अशुद्ध रक्त शोषण केल जाते व चेहऱ्यावरील फोडं, पुरळ कमी होतात.

चिघळलेल्या जखमा, मधुमेहातील न बरे होणारे व्रण जलौका लावल्याने बऱ्या होतात.

एक्झीमा, त्वचाविकार असल्यास जळवा लावल्यास अशुद्ध रक्त निघाल्यामुळे त्वचारोग कमी होतात.

अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढण्याकरीता या जळवा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींमधे देखील लावता येते. त्याचे काहीही त्रास होत नाही.

खूप जलद फायदा करणारी चिकित्सा म्हणून जलौकावचरण उपयुक्त आहे.

तीव्र वाढलेल्या लक्षणांमधे लवकर फायदा करणारी ही चिकित्सा आहे.

मुख्य म्हणजे काहीही त्रास न होता करता येणारी ही चिकित्सा आहे. रक्तमोक्षण पंचकर्माचे विविध प्रकारामधील, जलौकावचरण हा एक प्रकार अर्थात आयुर्वेद तज्ज्ञाच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे.

ayurveda